Tuesday, February 27, 2024
Homeभंडारानियम न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई - जिल्हाधिकारी संदीप कदम

नियम न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई – जिल्हाधिकारी संदीप कदम

• दुकानांना आकस्मिक भेट
भंडारा –
अनलॉक नंतर व्यवसायीक, व्यापारी व नागरिकांना नियमांची जाणीव करून देणे व जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी पोलीस विभागाने भंडारा शहरात रूट मार्चचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी अनेक दुकानांना अचानक भेट देऊन कोविड नियमांचे पालन होते किंवा नाही याची शहानिशा केली.


नियमांचे काटेकोर पालन होते की नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व एसपी यांनी ऑन फिल्ड तपासणी केली. या पाहणीत सॅनिटायझर नसने, मास्क न वापरणे व सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या दुकानांवर नगरपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासन सक्त कारवाई करेल असा, इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मुख्याधिकारी विनोद जाधव, पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यावेळी उपस्थित होते.
पोलीस विभागाच्या वतीने कोरोना जनजागृती व अनलॉक नियमांचे पालन करण्यासाठी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक, बसस्थानक, पोस्ट ऑफिस चौक, गांधी चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक असा रूट मार्च काढण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरली असून मागील तीन महिन्यात रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढली. ही बाब लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काही निर्बंध घालून दिले होते. त्यामुळे रुग्ण संख्या कमी झाली. व्यवसाय व्यापार व दैनंदिन जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी शासनाने कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून निर्बंध शिथील केले आहेत. आज भंडारा शहरातील व्यापार व्यवसाय सुरू झाले असले तरी काही ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब गंभीर असून व्यापारी प्रतिष्ठाण सुरू करण्याबाबत ठरवून दिलेले नियम न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दुकानात कोरोना नियमांचे पालन होते किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. रूट मार्च दरम्यान त्यांनी अनेक दुकानांना भेटी दिल्या. काही ठिकाणी मास्कसुद्धा लावले नसल्याचे आढळून आले. ग्राहक तर सोडाच सेल्समन सुद्धा मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ग्राहकांना व दुकानदारांना पालिका कर्मचाऱ्यांनी दंड आकारला. या पुढेही असेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास यापेक्षा सक्त कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
………………………
नागरिक बेफिकीर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम समोर असतांनाही नागरिक धडा घेतांना दिसत नाहीत. मास्क वापरा हे वारंवार सांगूनही मास्क न वापरणे, लावला तरी हनुवटीवर लावणे, पान तंबाखू व खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशी बेफिकिरी मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. अशा बेफिकीर व्यक्तींना आज पोलिसांनी चांगलीच तंबी दिली.
………………………
नियमांचे उल्लंघन 14500 रुपये दंड
‘ब्रेक द चैन’ नियमांचे उल्लंघन केल्याचे रूट मार्च दरम्यान निदर्शनास आल्याने संस्कृती रेडिमेड गारमेंटला 5 हजार रुपये, भारत फॅशन मॉल व सिटी फॅशन मॉलला प्रत्येकी 1 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. मास्क न वापरणाऱ्यांनाही यावेळी दंड केला. आजच्या कारवाईत मास्क न लावणे, सॅनिटायझर न ठेवणे व सुरक्षित अंतर न राखणे यासाठी सर्व मिळून 14 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

4 COMMENTS

Most Popular