गोडाऊन फुल्ल : हरदोली येथील प्रकार, शेतकऱ्यांमध्ये आक्रोश
लाखनी / पालांदूर : गोडाऊनची अपुरी जागा. त्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानसाठा जास्त झाल्याने गोडाऊन हाऊस फुल्ल झाले. त्यामुळे जागे अभावी मागील आठ दिवसांपासून धान खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांची बोळवण होत आहे. हा संतापजनक प्रकार हरदोली धान खरेदी केंद्रावर घडला असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
पालांदूर जवळील हरदोली येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, जागे अभावी आता हे केंद्र बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची दैनवस्था झाली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यात काही ठिकाणी विलंबाने धान खरेदी सुरू करण्यात आली. विलंबाने सुरू झाल्यामुळे शेतकऱ्याला धान विकायला विलंब झालेला आहे. या विलंबामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी धान खरेदी सुरू करण्यापूर्वी नियोजनात कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची धान मोजण्याकरिता तारांबळ उडालेली आहे.
धान उत्पादनाकरिता शेतकऱ्यांना असह्य त्रास सहन करीत शेती करावी लागत आहे. पूर समस्या, तुडतुडा, व आता मोजणी करिता त्रास होत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी बारदाना अभावी धान खरेदी बंद आहे. तर गोदाम अभावाने बऱ्याच ठिकाणी धान खरेदी प्रभावित आहे. अशा कठीण प्रसंगात जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याप्रति सहानुभूती बाळगत तात्काळ धान खरेदी सुरू करावी. जेणेकरून शेतकरी वर्गाला धान विकायला सुलभता मिळेल.
धान कापणी, बांधणी, मळणीचे सगळे व्यवहार उधारीवर असल्याने शेतकरी धानाच्या कार्यासाठी आतुरलेला आहे. परंतु धानच मोजून झाले नसल्याने पैसे मागावे कुणाला हा यक्षप्रश्न पुढे आलेला आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष देत नसल्याने शेतकरी राजा केवळ नावाचाच राजा ठरलेला आहे. धान पिकविताना सुद्धा समस्या व पिक विकण्याला सुद्धा समस्याच समस्या उभ्या आहेत. जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने शेतकऱ्यांच्या समस्यांची आपुलकीने दखल घेणे गरजेचे आहे. बंद असलेले धान खरेदी सुरू तात्काळ सुरू करावे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
प्रतिक्रिया
गोडाऊन अभावाने मागील आठ दिवसापासून धान खरेदी प्रक्रिया बंद आहे. सुमारे ३३५ शेतकऱ्यांची नऊ हजार ९९४५.८० क्विंटल धानाची खरेदी केली आहे.
- संजय देशमुख,
ग्रेडर, धान खरेदी केंद्र हरदोली प्रतिक्रिया
धान मोजणीकरिता शेतकरी तळमळ करीत आहेत. गोदाम अभावाने खरेदी बंद आहे. गोदाम फुल्ल झाल्याने मोजणी प्रभावित आहे. अशा कठीण प्रसंगात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने पुढाकार घेत पर्यायी व्यवस्था करावी. - गोपीचंद भेंडारकर,
माजी जि. प. सदस्य तई (बु.)