विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
पोहरा : उन्हाळी हंगामाकरिता पऱ्हे पेरणीचा मुहूर्त सुरू झालेला आहे. या मुहूर्ताला अधिक प्रभावी करण्यासाठी धानाला बीज प्रक्रिया महत्त्वाची असते. तिचे प्रात्यक्षिक थेट शेतकरी राजासोबत सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी पालांदुर मंडळ कृषी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.

दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. उत्पादन खर्च वाढत चालल्याने शेतकऱ्यांचा नफा कमी होत आहे. यातून शेतकरी वर्गांना मार्गदर्शन करीत शेती अधिक नफ्याची व्हावी. याकरिता मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर आपल्या संपूर्ण चमूसह तत्पर आहेत. शासकीय सुट्टी असली तरी शेतकरी राजासोबत आपली हजेरी लावीत शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन करीत आहेत. धानाचे बियाणे धानाच्या चार पट महाग असते. यात शेतकरी वर्गाला सुमार खर्च येतो. हा खर्च कमी व्हावा, या प्रामाणिक हेतू ने मंडळ कृषी कार्यालय पालांदूर यांनी मोहीम उघडली आहे. शेतकऱ्यांच्या घरी जात त्यांना बीज प्रक्रिया स्वतःच्या उपस्थितीत समजून सांगत त्यांना शहाणे करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. याचा प्रात्यक्षिक पालांदूर येथील प्रगतशील शेतकरी तथा बागायतदार बळीराम जयराम बागडे यांच्या घरी १५ शेतकऱ्यांच्या उपस्थित बीज प्रक्रिया कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीत घेण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी सुखदेव भुसारी, पुरुषोत्तम भुसारी, सुखराम मेश्राम वाकल, प्रभाकर कडूकार, मोहन लांजेवार, गोकुळ राऊत, फत्तु राऊत, केजाजी राऊत, मुखरू बागडे, दिलीप राऊत, थालीराम नंदुरकर, प्रगतशील शेतकरी बावने वाकल आदी शेतकरी कार्यक्रमात हजर होते.
कृषी सहाय्यक शेखर निर्वाण यांनी धानाचे बियाणे स्वतः मिठाच्या पाण्यातून काढून घेतले. नंतर त्यांना साध्या पाण्याने स्वच्छ धूत सुखवत मोकळे ठेवले. बुरशीनाशक बियाणाला चोळून नंतरच पेरणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रथमताच बीज प्रक्रिया स्वतः प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पाहिला. यावेळी शेतकरी वर्गातून प्रभाकर कडूकार व सुखदेव भुसारी यांनी त्यांच्या मनातील प्रश्नांना वाट मोकळी करत मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांच्याकडून उत्तरे जाणून घेतले.
प्रतिक्रिया
कृषी केंद्रातून महागडे बियाणे घेण्यापेक्षा घरातीलच खरिपाचे बियाणे काळजीपूर्वक ठेवून बीज प्रक्रिया करण्याचे नियोजन केले. कृषी अधिकाऱ्यांनी थेट भेट देत बीज प्रक्रियेची पद्धत समजावून सांगितली. यात अत्यल्प खर्चात बियाणे कीडमुक्त उत्कृष्ट ठरली.
- बळीराम बागडे,
प्रगतशील शेतकरी पालांदूर प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध, अभ्यासपूर्ण कमी खर्चाची व्यवस्थित शेती करावी. पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने दिलेल्या विविध योजनांची माहिती जाणीव व्हावी. त्यातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. हीच शासनाची भूमिका आहे. - गणपती पांडेगावकर,
मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर