Home भंडारा “त्या” सिमेंट रस्त्याची क्वालिटी कंट्रोल द्वारा चौकशी करावी

“त्या” सिमेंट रस्त्याची क्वालिटी कंट्रोल द्वारा चौकशी करावी

0
“त्या” सिमेंट रस्त्याची क्वालिटी कंट्रोल द्वारा चौकशी करावी

मुरमाडी/सावरी प्रभाग क्रमांक ३ मधील जनतेची मागणी

सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट
लाखनी :
ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी शासन कटिबद्ध असून अनेक योजनांचे माध्यमातून याकरिता आवश्यक तो निधीही उपलब्ध केला जातो पण क्रियान्वयन यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे फलनिष्पत्ती होत नसल्याचा प्रत्यय मुरमाडी/सावरी येथे आला. नागरी सुविधेअंतर्गत करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामात कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्याचे संगनमताने साहित्याचा अल्प प्रमाणात वापर करून बांधकाम निकृष्ट केले असल्याचा आरोप प्रभागातील नागरिकांनी केला असून गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे(क्वालिटी कंट्रोल) चौकशीची मागणी केली आहे.


मुरमाडी/सावरी प्रभाग क्रमांक ३ मधील रामदास कठाने ते मेटे ते आगाशे बाबू यांचे घरापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे आवागमन करणारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. गावकऱ्यांच्या सोयीचा विचार करून ग्रामपंचायत कमिटीने लेखाशिर्ष नागरी सुविधा अंतर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये नियोजनात समाविष्ट करून पंचायत समिती लाखनी मार्फत जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. जिल्हाधिकारी भंडारा यांचे सिफारशीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी मुरमाडी/सावरी प्रभाग क्रमांक ३ रामदास कठाने ते मेटे ते आगाशे बाबू यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकीय रक्कम २ लाख १६ हजार रुपये आहे.
करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने करण्यात आला असून यावर तांत्रिक मार्गदर्शन , सनियंत्रण आणि देखरेखीचे काम पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता डी. जी. राघोर्ते यांचेकडे सोपविण्यात आले होते. कागदोपत्री करारनामा ग्रामपंचायतीचे नावे असला तरी हे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम एका ग्रामपंचायत सदस्याने केले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. अंदाजपत्रकाप्रमाणे ह्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची रुंदी ३ मीटर असताना ४ मीटर करण्यात आल्यामुळे अर्ध्याच रस्त्याचे सिमेंट रस्ता झाला आहे. अर्धा रस्ता तसाच बाकी आहे. कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्याचे संगनमताने साहित्याचा अत्यल्प वापर केल्याने सिमेंट रस्ता बांधकाम निकृष्ट प्रतीचे झाले आहे. प्रभागातील जनतेने विरोध केला असता अरेरावीची भाषा वापरली जाते. सिमेंट व आवश्यक साहित्य अल्प प्रमाणात वापरून सबंधित कंत्राटदाराने सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप करून गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे(क्वालिटी कंट्रोल) चौकशीची मागणी प्रभागातील जनतेने केली आहे.