भंडारा : वैनगंगा नदी किनाऱ्यावरील कारधा गावातील झोपडपट्टी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज शुक्रवारला सकाळी झोपडपट्टी परिसरातील काही नागरिकांना वैनगंगा नदी किनाऱ्यावरील दगडाच्या पिचिंगवर एक तरुण झोपलेला आढळला. नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता त्याची हालचाल होत नसल्याने संशय बळावला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहितीवरून कारधाचे ठाणेदार दीपक वानखेडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास ठाणेदार वानखेडे करीत आहे. तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.