मोहाडी : तालुक्यातील डोंगरगाव येथे गोदाम उपलब्ध आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता मोहाडी खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे धान खरेदी उपकेंद्र डोगरगाव येथे तात्काळ सुरु करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा विकास फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायधने यांनी दिला आहे.

मोहाडी तालुक्यातील मोहाडी – रामटेक राज्यमार्गावरील डोंगरगांव येथे मागील वर्षी एका सुशिक्षित बेरोजगार संस्थेला धान खरेदी केंद्र देण्यात आले होते. तसेच शेतकरी खरेदी विकी सहकारी संस्था मोहाडीला मिळालेल्या धान खरेदी केंद्राअंतर्गत उपकेंद्र देण्यात आले होते. या केंद्रामुळे मागच्या वर्षी डोंगरगाव परीसरातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी कुठलाही त्रास झाला नाही. मात्र, यावर्षी डोगरगाव येथे एकही धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नसल्याने या परीसरातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आज ना उद्या, केंद्र सुरु होईल या आशेने शेतकऱ्यांनी धान घरी अंगणात आणुन ठेवले आहे. डोंगरगाव येथे गोदाम उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता मोहाडी खरेदी विक्री सहकारी संस्थेचे धान खरेदी उपकेंद्र डोगरगाव येथे सुरु करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भंडारा जिल्हा विकास फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायधने यांच्या नेतृत्वाखाली सुहास लांजेवार, शिवदास अतकरी, पंढरी अतकरी, गोपाल शहारे, गंगाधर भुते, अशोक धारगावे, जगदीश चाचिरे, हिरालाल समरीत, राजेश मते, बापू सेलोकर यांनी मोहाडी तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार मिनल करणवाल यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.