भंडारा :
करोना संसर्गाची तिसरी लाट टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला गती आली असून गुरुवारी एकाच दिवशी विक्रमी २२ हजार ९७ नागरिकांनी लस घेतली. जिल्ह्यात ८६ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डाेस घेतला असून लसीकरणात भंडारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता रविवारी जिल्ह्यातील २२५ केंद्रांवर विशेष अभियान राबविण्यात येत असून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ७२ हजार ६४३ नागरिकांनी लसीचा पहिला डाेस, तर तीन लाख ७ हजार ७१६ नागरिकांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे.


गुरुवारी जिल्हाभर विशेष लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात आठ हजार ९८२ लाभार्थ्यांनी पहिला डाेस, तर १३ हजार २०५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. यासाठी आराेग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक व सरपंचांनी सहकार्य केले आहे. जिल्ह्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८६ टक्के असली तरी, पात्र हाेऊनही दुसरा डाेस न घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३८ टक्के आहे. अशा नागरिकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन दुसरा डाेस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी क्तीं सुध्दा प्राधान्याने लस घ्यावी. सहव्याधी असणारे व्यक्ती लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता रविवारी २२५ ठिकाणी लसीकरण अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचे काैतुक – विक्रमी लसीकरण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काैतुक केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुखी, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी माधुरी माथुरकर उपस्थित हाेते. लसीकरणात सहभाग नाेंदविणाऱ्या सर्वांचे यावेळी काैतुक करण्यात आले.