वरठी :
काही दिवसापासून सुरू अअसलेल्या संततधार पावसामुळे जीर्ण झालेली घराची भिंत कोसळून रस्त्यावर उभ्या कारचा चुराडा झाला. सदर घटना 7 सप्टेंबर रोजी वरठी येथील सुभाष वार्डात घडली. यात घरमालकासह कारमालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. वरठी परिसरात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू आहे.
अशातच सुभाष वार्ड येथील विष्णू कोर्वेकर यांच्या दुमजली कौलारू घराची मातीविटांची भिंत जीर्ण होऊन रस्त्याच्या दिशेने कोसळली. यावेळी समोरील अंजना नाईक यांच्या घराबाहेर ठेवलेल्या कारवर भिंतीचा मलबा कोसळला. यात कारचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने कारमध्ये किंवा रस्त्यावर कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. सदर घटनेत घरमालकाचे अंदाजे 5 लाखांचे तर कार मालकाचे 8 लाखाचे नुकसान झाले आहे. याचवेळी जवळील प्रदीप आनंदराव लोहबरे व विठाबाई क्षिरसागर यांच्याही घराचे कौलारू छत कोसळून मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त कुटूंबियांना प्रशासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी होत आहे.