• मुरमाडी/तुप. जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेचा सवाल
लाखनी :-
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे संकेत मिळाले असून प्रभाग निहाय आरक्षण सोडतीस २४ तासाचा कालावधी लोटत नाही तोच इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. कोरोना काळात जनतेला मदत व धीर देण्याची गरज असताना जनतेपासून अलीप्त असणाऱ्यांना त्यावेळी जनतेची आठवण का झाली नाही असा जनतेतून सुर उमटत आहे.

चुलबंद नदी खोऱ्यात वसलेल्या मुरमाडी/तूप. जिल्हा परिषद क्षेत्रात मिरेगाव , सोनमाळा , भूगाव , मेंढानगर , विहिरगाव , खूनारी , पळसगाव , कोलारी झरप , कोलारा , निमगाव , कन्हाळगाव , दिघोरी , मुरमाडी/तूप. , डोंगरगाव , रामपुरी , नान्होरी , शिवणी इत्यादी गावांचा समावेश होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत जुलै २०२० रोजी संपूनही कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासक नेमण्यात आले होते. १४ महिने लोटल्यानंतर कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुकीचे संकेत दिले असून नुकतेच प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले. यास २४ तासाचा कालावधी लोटत नाही. तोच इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क सुरू केला आहे. मुरमाडी/तूप. जिल्हा परिषद क्षेत्र नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने उमेदवारांची यादी मोठी आहे. अनेक बाहेरील उमेदवारांचाही या क्षेत्रावर डोळा आहे. पण यातील अनेकांनी कोरोना कालावधीत क्षेत्रात फिरण्याचेही धाडस दाखविले नाही. कोरोना कालावधीत जनतेस मदत व धीराची अपेक्षा असताना यातील अनेक भूमिगत झाले होते. एका माजी जि. प. सदस्याने किमान ६ महिने घराबाहेर पडणे अथवा बाहेरील व्यक्तीस घरी येण्यास मज्जाव केला होता. अशीच अनेक इच्छुक उमेदवारांची परिस्थिती होती. पण सामाजिक कार्यकर्ते गणेश निरगुळे याने लोकात मिसळून मदतीसह धिरही दिला. लोकांमध्ये मिसळल्याने ते स्वतः कोरोना संक्रमित झाले. पण निवडणुकीची चाहूल लागताच ज्यांचा या जिल्हा परिषद क्षेत्राशी संबंध नाही. असे अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय झाल्यामुळे कोरोना काळात हे इच्छुक उमेदवार गेले होते कुठं? अशा जनतेत चर्चा होत आहेत.
असे आहे जि. प. क्षेत्राचे आरक्षण(चौकट)
१) लाखोरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
२) मुरमाडी/सावरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
३) केसलवाडा/वाघ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४) पोहरा – अनुसूचित जाती महिला
५) मुरमाडी/तूप – नागरिकांचा मागास प्रवर्ग
६) पालांदुर – सर्वसाधारण महिला