भंडारा : २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकाचे व घराचे नुकसान झाले. पीकहानीची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते.

संचालक कृषी मंत्रालय आर.पी.सिंग व महेंद्र साहारे यांच्या नेतृत्वातील पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा पिंडकेपार व पवनी तालुक्यातील खाकसी या गावाला भेट देवून पाहणी केली.
जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यक्रारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, सहाय्यक संचालक कृषी रविंद्र भोसले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, तहसिलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे व उपविभागीय कृषि अधिकारी मिलींद लाड यावेळी उपस्थित होते. पाहणी दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून आढावा घेतला. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा येथे भेट देऊन बाजार समितीत आलेल्या धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांच्याकडून यावर्षी आलेल्या धान्याची प्रतवारी पथकाने जाणून घेतली. गेल्या वर्षिच्या तुलनेत या वर्षी तुटलेल्या धानाची टक्केवारी ३० टक्क्यांपर्यंत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अतिपावसामुळे मुगाचे उत्पन्न सुद्धा हलक्या प्रतीचे झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. कृषि उत्पन्न बाजार समितीत आलेले धान व मुगाची पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली.
भंडारा तालुक्यातील पिंडकेपार गावाला पथकाने भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. यानंतर शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी राकेश विठ्ठलराव वंजारी, लक्ष्मण निंबार्ते व वसंत सार्वे (बेला), या शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे धानाचे उत्पन्न ६९ ते ७० टक्यांनी घटल्याचे शेतकऱ्यांनी पथकास सांगितले. सध्या चना आणि गहू हे रब्बीचे पिक शेतात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या दौऱ्यात केंद्रीय पथकाने पवनी तालुक्यातील खाकसी गावाला भेट दिली. या भेटीत पथकाने नागरीकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला-कोरंभी रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त केला असून या मार्गाने आता दळणवळण व्यवस्था सुरळीत सुरू झाली आहे. याबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.
अतिवृष्टीमुळे भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी व लाखांदूर तालुक्यातील १४४ गावे प्रभावीत झाली होती. या पुरात पाच हजार ३९८ घरांचे नुकसान झाले होते. त्याच प्रमाणे चार व्यक्तींचा मृत्यू झाला. जिल्हयातील १९ हजार ७९३ हेक्टर मधील पिकाचे नुकसान झाले. या सोबतच पाणी पुरवठा योजना, मत्स व्यवसाय, विद्यूत, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.