भंडारा : परिसराचा विकास कोण करू शकतो. याची ओळख करून जनतेने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
बेला येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार राजू करेमोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, धनंजय दलाल, सरिता मदनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, युवक जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना पटेल यांनी, भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

देशाची आर्थिक व्यवस्था कमकुवत झाली आहे. यामुळे देशात प्रत्येक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही भाजपच्या केंद्र सरकारने याचा भार नागरिकांच्या खांद्यावर टाकला आहे. मागील सहा वर्षांचा विचार केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सर्वात मोठी वाढ या सरकारने केली आहे. इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने याचा परिणाम ट्रान्सपोर्टवर पडला आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. आम्ही आमची जबाबदारी समजून जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने कार्य करीत आहे. नागरिकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखून लोकप्रतिनिधींची निवड करताना योग्य व्यक्तीची निवड करावी, असे आवाहन पटेल यांनी केले.
कार्यक्रमाला नरेंद्र झंझाड, जीवनचंद्र निर्वाण, मर्कांड तीतीरमारे, अश्विन बांगडकर, सोनू खोब्रागडे, किरण वाघमारे, बंडू चेटुले, भगवान वाभरे, चैतराम सेलोकर, सुनील इलमे, श्रावण चेटूले, तुकाराम चेटूले, विनोद नागपुरे, रत्नमाला चेटूले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.