• लाखनी येथील घटना
• साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार
लाखनी :

इयत्ता बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्या ची घटना बुधवारी (ता.८) रात्री ८:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मयुरी किशोर वंजारी(१८) रा. सेलोटी रोड, लाखनी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती समर्थ महाविद्यालयात इयत्ता बाराव्या वर्गात शिकत होती.
मयुरी किशोर वंजारी ही समर्थ महाविद्यालयात कला शाखेत इयत्ता बाराव्या वर्गात शिकत होती. नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. मयुरी ने आपला निकाल ऑनलाईन तपासला असता त्यात तिला ५५ टक्के गुण मिळाल्याचे समजले. परंतु मयुरीला त्यापेक्षा अधिक गुण मिळण्याची अपेक्षा असल्याने अपेक्षा भंग झाल्याने आलेल्या नैराश्यातून तिने तांदळा ला लावण्याचे विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्याने उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उत्तरीय परिक्षणासाठी मृतदेह पाठवण्यात आला. उत्तरीय परीक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साश्रू नयनांनी स्थानिक स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलीस हवालदार दिगंबर तलमले, पोलीस शिपाई नितीन बोरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे. होतकरू विद्यार्थिनी मयुरीच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.