भंडारा :
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायचे नाव घेत नसल्याने अधिकाऱ्यांनी आता काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बससेवा सुरू केली.
संपकरी कर्मचाऱ्यांचा विरोध नसला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात येत असले तरी कामावर यायला कर्मचारी तयार नाही. भंडारा विभागातील सहा आगाराची बससेवा गत ४१ दिवसांपासून ठप्प झाली आहे. दहा दिवसांपासून बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला साकोली आगारातून बस सुटली. या बसला पोलिसांनी संरक्षण दिले. त्यानंतर भंडारा आगारातूनही दोन बस निघाल्या. बसच्या फेऱ्या सुरू असून त्याला प्रवाशांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. मात्र, केवळ चार बस सुरू असून यामुळे प्रवाशांना तेवढा फायदा होत नाही. ३६३ बस आगारात उभ्या आहेत. कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपकऱ्यांचा विरोध नाही पण कामावरही नाही – भंडारा विभागातील १४४३ कर्मचाऱ्यांपैकी १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सुरूवातीला १७८ कर्मचारी कामावर आले. – गत दहा दिवसापासून बससेवा सुरू झाली असून भंडारा आगारातील तीन, गोंदिया पाच, साकोली तीन, तुमसर एक, तिरोडा १२, पवनी एक असे चालक वाहक कामावर आले. परंतु केवळ चारच बसेस सुरू करण्यास महामंडळाला यश आले. लालपरी शिवाय प्रवास नाही एसटीच्या संपाने बाहेरगावी जाणे महागले आहे. खासगी वाहनातून प्रवास करताना अधिक पैसे मोजावे लागतात. वेळेवर वाहन मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे लालपरी लवकरात लवकर सुरू करावी. ग्रामीण भागात तर खाजगी वाहने येण्यासही तयार नाही. प्रवासी एसटीचा प्रवास सुरक्षित असतो. मात्र आता नाईलाजाने बाहेरगावी जाण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. आधीच या वाहनात प्रवासी कोंबून असतात. त्यात अनियंत्रित वेगाने वाहन चालविली जाते.