विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
पोहरा / पालांदुर : तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार झालेल्या किटाडी- मांगली, पेंढरी हा ११ किलोमीटरचा रस्ता टिप्परच्या ओव्हरलोड वाहतुकीने संपूर्णतः खड्ड्यात गेला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे या मार्गावरून गेल्यास हमखास अपघात होईल, यात दुमत नाही. त्यामुळे या रस्त्याकडे लक्ष देऊन दुरुस्त करण्याची गरज आहे.
या परिसरातील ग्रामपंचायतच्या सरपंचांनी बांधकाम विभाग भंडारा व नेरला उपसा सिंचन प्रकल्पावर काम करणाऱ्या कंपन्यांना लेखी निवेदन देत रस्ता दुरुस्तीची मागणी केलेली आहे. पालांदूर परिसरात नेरला उपसा सिंचन कालव्यावर बेधडकपणे रात्रंदिवस बांधकाम सुरू आहे. या कालव्यावर लागणार खनिज साहित्य आणण्याकरिता मोठ्या टिप्परची मदत घेतली आहे. ओव्हरलोड टिप्पर भरधाव पणे धावत आहेत. दुप्पट भार घेत सदर टिप्पर धावत असल्याने रस्त्याची पूर्णतः ऐशी की तैशी झालेली आहे. यामुळे या परिसरातील जनतेला प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
या परिसरातील पाच ते दहा गावांना तालुका, जिल्हा व उपराजधानीला जाताना हा एकमेव मार्ग आहे. शाळकरी मुलांना तर सायकलने तथा पायी जाताना अक्षरशः अपघाताची भीती मनात ठेवून प्रवास करावा लागतो. वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी सुद्धा ग्रामपंचायत सरपंच यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित बांधकाम विभागाचे सुद्धा फावले आहे. या परिसरातील सरपंचांनी खासदार महोदयाकडे सुद्धा गाऱ्हाणी मांडलेली आहे. खासदार महोदयांनी संबंधित बांधकाम विभागाकडे चौकशी करीत सदर रस्त्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा या परिसरातील जनतेसह सरपंचांनी सुद्धा मागणी केलेली आहे.
चौकट
कंत्राटदाराने केले दुर्लक्ष
अथक प्रयत्नानंतर किटाळी, मांगली, पेंढरी या रस्त्यावर डांबरीकरण झाले. यापूर्वी हा रस्ता बांधकाम विभागात विविध मुद्द्यावर नेहमीच गाजत राहिला. खूप प्रयत्नानंतर गत तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्यावर दोन कंपन्यांच्या माध्यमातून काम करण्यात आले. या ११ किमी रस्त्यावर नागपूर येथील एका कंपनीने सहा किलोमीटर तर तुमसर येथील एका कंपनीने पाच किलोमीटर रस्त्याचे बांधकाम केले. सदर रस्ता बांधकामानंतर देखभाल दुरुस्तीचे काम सुद्धा त्याच कंपनीने सांभाळायची होते. मात्र, त्यांनी जनतेच्या अपेक्षेला वाटाण्याच्या अक्षदा दाखवीत रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.
प्रतिक्रिया
मांगली ते पेंढरी हा सहा किलोमीटरचा रस्ता अक्षरशः फुटलेला आहे. किटाडी ते पेंढरी हा ११ किलोमीटरचा रस्ता तर खड्ड्यात आहे. बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नेरला उपसा सिंचन कालव्यावर काम करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सदर रस्ता प्रवाशांच्या जीवावर उठलेला आहे. बांधकाम विभागाने वेळीच दखल घेत रस्त्याला न्याय द्यावा.
- प्रदीप मासुरकर,
सरपंच मांगली (बांध) प्रतिक्रिया
रस्त्याच्या अवस्थेकरिता नेरला उत्सव सिंचन योजनेचे काम करणाऱ्या ओव्हरलोड टिप्पर जबाबदार आहेत. त्यांना यापूर्वी पत्र सुद्धा दिलेले आहे. बांधकामाकरिता शक्य ते प्रयत्न केले जातील. - एस. एम. हरकंडे,
अभियंता बांधकाम भंडारा