बारव्हा : शेतशिवारातून मुख्य मार्ग ओलांडून जंगलाकडे पळत सुटलेल्या एका साडे चार वर्षीय चितळाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत चितळ जागीच ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना २५ डिसेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर-साकोली मार्गावरील दिघोरी (मोठी) गावाजवळ घडली.
रब्बी पिकांसह भाजिपाल्याची पिके दिसून येत आहेत. सदर पिके खाण्यायोग्य झाल्याने सद्या वन्यप्राण्यांचा शेतशिवाराकडे वावर सुरु झाल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान दिघोरी (मोठी) गावालगतच्या परिसरात जंगलव्याप्त परिसर असल्याने या भागात नेहमीच वन्य प्राण्यांचा शेतशिवाराकडे शिरकाव दिसून येत असल्याचे सांगण्यात येते. घटनेच्या दिवशी एक साडे चार वर्षीय चितळ दिघोरी गावालगतच्या शेतशिवारातून लाखांदूर-साकोली हा मुख्य मार्ग ओलांडत असतांना या मार्गावरुन भरधाव वेगाने धावणा-या एका अज्ञात वाहनाने चिताळाला जबर धडक देवून घटनास्थळावरून पसार झाला.
या धडकेत चितळ गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती लाखांदूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, क्षेत्रसहाय्यक दिघोरे,पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत, गस्तिपथक वनपाल पिल्लेवान, वनरक्षक खन्डागळे, बिट रक्षक मुंडे यासह अन्य वनकर्मचा-यांनी घटनास्थाळी जावुन पंचनामा करीत मृत चितळाचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सद्या वन्यप्राण्यांचा चा-याच्या शोधात शेतशिवाराकडे मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. सदर प्राणी मुख्य मार्ग ओलांडत असतांना अपघातात मृत्युमुखी पडू नयेत यासाठी वाहनचालकांनी जंगल परिसरातील रस्त्यावरुन वाहने मर्यादीत वेगाने चालवावित असे आवाहन लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी केले आहे.