विदर्भ कल्याण / सिर्सी
शेतात सोयाबीन ची कापणी सुरू असताना साप असल्याची माहिती मिळाली. लागलीच शेतमालकाने सर्पमित्रांना फोन करून बोलावले. सर्पमित्रांनी सापाला शोधले असता तो पांढऱ्या रंगाचा नाग असल्याचे आढळून आले. हा पांढरा नाग जगातला दुर्मिळ साप म्हणून ओळखल्या जातो.
सध्या परिसरात सोयाबीन कापणी चा हंगाम सुरू आहे. गणेश बालपांडे यांच्या शेतात सोयाबीन कटाई सुरू असताना काही मजुरांना साप असल्याचे दिसून आले. मजुरांनी ही गोष्ट शेतमालकाला सांगितली. लागलीच शेतमालकाने गावातील सर्पमित्र निखिल गडमडे व कैलाश वलके यांना बोलावले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने या सापाला पकडून जीवनदान दिले. आतापर्यंत गावातील या सर्पमित्रांनी हजारो च्या वर विषारी व बिनविषारी सापांना पकडून दूर जंगलात सोडून जीवनदान दिले आहे. पण आपण आयुष्यात पहिल्यांदाच अश्या प्रकारचा पांढरा विषारी नाग पकडल्याचे सांगितले. या अगोदर या दुर्मिळ असलेल्या पांढऱ्या नागाला पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्यात पकडल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे हा नाग दुर्मिळ असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असतो. पांढरा नाग किंवा अल्बिनो कोब्रा ही वेगळी प्रजाती नसून नागाच्या डीएनएमध्ये बदल झाल्यामुळे नागाचा संपूर्ण रंग पांढरा दिसतो. या पकडलेल्या सापाला नंतर सर्पमित्रांनी दूर घनदाट जंगलात सोडून दिले.