विदर्भ कल्याण/ पुंडलीक कामडी
सिर्सी: उमरेड तालुक्यात असलेल्या सिर्सी गावात सट्टापट्टी चा धंदा धुमधडाक्यात सुरू असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे गाव व परिसरातील उतार छोट्यामोठ्या गावातील तरुण पिढी व मजूर वर्ग या सट्टापट्टी कडे आकर्षीत होतांना दिसून येत आहे.

सट्टा चा व्यवसाय इतक्या शांतपणे चालतो की त्याचा पत्ता जवळ बसलेल्या लोकांना सुद्धा चालत नाही. एक व्यक्ती कोरा कागद घेऊन बसतो व ग्राहकांनी सांगितलेला आकडा कागदाच्या छोट्या तुकड्यावर लिहून देतो. काही काही विशिष्ट लोकांचे आकडे नुसत्या फोन वर सुद्धा घेतले जातात. सट्टा खेळणाऱ्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की या खेळाच्या नादात काही लोकांनी आपली जमीन व प्रॉपर्टी सुद्धा गमावून बसलेले आहेत. पाच ते सहा लोक एका ठिकाणी बसतात व ग्राहक आकडा लावून एक छोटीशी पट्टी घेऊन निघून जातात अशी माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे.
लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील तीन गॅंग हा सट्टापट्टी चा व्यवसाय चालवितात. कोरोना काळात इतर उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले होते. अशाही परिस्थितीत हा व्यवसाय खूप धडाक्यात सुरू होता. सकाळ उजाडताच बाजार परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी हा दरबार भरत असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. तरुण पिढी व मजूर वर्ग झटपट पैसे मिळविण्याच्या नादात या व्यसनात अडकत चालले आहे. बाहेरगाव वरून आलेले लोक सुद्धा या ठिकाणी सट्टा लावण्यासाठी ठाण मांडून बसतात. बेकायदेशीर असलेल्या या व्यवसायाला नेमके कोणाकडून संरक्षण मिळत आहे? असे प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.