Monday, March 4, 2024
Homeनागपुरकाही ग्रा.प. सदस्यांची महिला सरपंच समोर हुल्लडबाजी

काही ग्रा.प. सदस्यांची महिला सरपंच समोर हुल्लडबाजी


विशेष सभेत बाहेरील उपद्रवी लोकांना आणून दबाव टाकण्यात येतो: सरपंच

विदर्भ कल्याण / सिर्सी

उमरेड तालुक्यातील सिर्सी गावामध्ये ग्रामपंचायत च्या बोलावलेल्या विशेष सभेत काही ग्रा.प. सदस्यांनी महिला सरपंच सौ. वंदनाताई बुटे यांच्यासमोर कोणत्याही लोकशाही परंपरेला न शोभणारे वर्तन केल्याप्रकरणी गावकरी नाराज दिसून येत आहे. गावात होत असणाऱ्या मेला (जत्रा ) ला ना हरकत प्रमाणपत्र देण्याविषयी ही विशेष सभा बोलाविण्यात आलेली होती. काही ग्रा.प. सदस्यांनी गावातील उपद्रवी लोक सोबत घेऊन सभेत गोंधळ निर्माण करून सरपंचावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला होता. विशेष म्हणजे ग्रा.प. सदस्य मनोज दांदडे व सतीश अड्डक यांनी जोरजोरात ओरडून सरपंच मॅडम च्या समोर असणाऱ्या टेबलवर हात आदळून वाजवत होते असा आरोप सरपंच सौ. वंदनाताई बुटे यांनी केलेला आहे.


दि. १०/३/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलाविण्यात आलेली होती. त्या सभेत गावात मेला लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्यात आलेला होता. यापूर्वी शासकीय ठिकाणी गावात होत असलेले कारनामे बघता गावचे प्रथम नागरिक या नात्याने सरपंच म्हणून वंदनाताई बुटे यांचा होकार नव्हता. नवीन बनत असलेला शासकीय दवाखाना सोडून अन्य कुठेही हा मेला लावा असे त्या म्हणत होत्या. तरीपण विरोधी गटाचे बहुमत असल्याने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु सरपंचांनी त्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. कोणत्याही शासकीय जागेवर हा मेला ( जत्रा ) घेण्यास त्यांची कोणतीही परवानगी नव्हती. जर काही बरेवाईट झाल्यास ना हरकत प्रमाणत्राच्या बाजूने सहमत असणाऱ्या ग्रा.प. सदस्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील असे त्यांनी सांगितले आहे. तसेच काही ग्रा.प. सदस्याद्वारे गावातील काही उपद्रवी व्यक्ती घेऊन त्यांच्यावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. महिला सरपंच असून सर्व गावकऱ्यांनी विकासाच्या अपेक्षा ठेऊन मला निवडून दिले आहे. गावातील लोकांची सेवा करताना व मी माझे कर्तव्य पार पाडताना जर कोणी ग्रामपंचायत सदस्य असे बाहेरील गुंड प्रवृत्तीचे लोक आणून माझेवर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केला तर त्यांची कोणतीही हयगय न करता पोलिसात तक्रार दिली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच दि. १०/३/२०२३ रोजी गावातील रस्त्यावर अतिक्रमण करून शासकीय जागेत घराचे बांधकाम करणाऱ्या लोकांच्या घराची मोकाचौकशी ठरविण्यात आलेली होती. हा प्रस्ताव ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी मांडला होता, त्यांच्याच असणाऱ्या अतिक्रमण विरोधात गावकऱ्यांनी सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केले होते. त्यात ग्रामपंचायत चे सर्व सदस्य चौकशीला जाण्यास ठरले होते व एक निस्पक्ष सरपंच म्हणून मी अतिक्रमण धारक ग्रा.प. सदस्य व इतर लोकांना मोका चौकशी ची नोटीस बजावली होती. परंतु त्यात ग्रामपंचायत सदस्य मनोज दांदडे व सतीश अड्डक यांच्या घराची सुद्धा मोकाचौकशी असल्याने त्यांनी सभेमध्ये गोंधळ निर्माण करून मला ” तुम्ही बेबनशाही लावली आहे का, आम्ही तुम्हाला कोर्टातच खिचतो व ग्रामपंचायत चे कामे आम्ही १२ ग्रामपंचायत सदस्य जे म्हणू तसेच झाले पाहिजे ” अश्याप्रकारे धमकी दिलेली आहे. बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये एका महिला सरपंच समोर गैरवर्तणूक करून धमकी देत होते व सभेची शांतता भंग करून मोका चौकशी ला समोर न जाता स्वतःच पसार झाले असे ग्रामपंचायत सिर्सी चे सरपंच सौ. वंदनाताई बुटे यांनी माध्यमांना लेखी स्वरूपात सांगितले आहे.
याविषयी गावातील लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत ला दिलेल्या अर्जात ग्रामपंचायत सदस्य मनोज दांदडे यांच्या असणाऱ्या अतिक्रमण विषयी माहिती दिलेली आहे. अगोदर त्यांनी स्वतः आपले अतिक्रमण पाडावे त्यानंतर आम्ही आमचे अतिक्रमण स्वतःच पडतो असे गावकऱ्यांनी आपल्या लेखी अर्जात नमूद केले आहे. ” करायला गेले काय अन उलटे झाले पाय ” अशी गत या ग्रामपंचायत सदस्यांची झाल्यामुळे ते मोका चौकशीला समोर न जाता पळून गेले अशी चर्चा गावात रंगलेली असून यांचेवर गावकरी हसू लागले आहेत. गरीब गावकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून बांधलेली घरं पाडण्याची कामं करून यांनी गरिबांना त्रास देऊ नये अशी प्रतिक्रिया गावकरी देत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular