जयस्वाल यांनी अधिकाऱ्याला पंचनामा करण्याचे आदेश

रामटेक :- मंगळवार दि. ११ जानेवारी ला सकाळी आणि दुपारी एक ते दोन तास मुसळधार अवकाळी पावसासोबतच जवळपास अर्धा तास गारपीट झाली. त्यात रामटेक तालुक्यातील टूयापार, जमुनिया, फुलझरी, दाहोदा, घोटी, पिपरिया, सिल्लारी या गावांमध्ये झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. त्यात मिरची, टमाटर. वांगे, कांदा, चना व गहू भाजीपाला व पिकांचा समावेश आहे. आमदार आशिष जयस्वाल यांना या अभूतपुर्व घटनेची माहिती मिळताच त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्यासमवेत नुकसानग्रस्त शेताचे निरीक्षण केले व झालेल्या नुकसानीचे तात्काळ मौका पंचनामे करण्याकरिता तलाठी व कृषी सहाय्यक यांना आदेशित करण्याकरिता तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी, रामटेक यांना आमदार आशिष जयस्वाल यांनी निर्देश दिले. नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, याकरिता प्रत्येक नुकसानग्रस्त शेतक-याच्या पिकाचे पंचनामे करण्यात यावे. चुकीचे शेतकरी येऊ नये व नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये, याकरिता यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर लावण्यासही सांगितले. शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आश्वासन आमदार आशिष जयस्वाल यांनी दिले. व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत, मंत्री सुनिल केदार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून झालेल्या नुकसानाबाबत माहिती दिली व शेतक-यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली आमदार आशिष जयस्वाल यांनी केली. कृषी मंत्र्यांनी गारपिटग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता सदर विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले. या निरीक्षण दौ-यात जि.प. सभापती तापेश्र्वर वैद्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच व शेतकरी उपस्थित होते.