जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संध्याताई गुरनुले यांच्या कडे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची मागणी
गडचांदुर- मो.रफिक शेख –
चंद्रपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजू नागरिकांकरिता नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते,त्याच अनुषंगाने कोरपना तालुक्यातील नारंडा, कवठाळा व मांडवा या प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर शिबिराचे आयोजन १८/९/२०२१ ला करण्यात आलेले होते परंतु ऐनवेळी सदर शिबिराचे आयोजन रद्द करण्यात आले त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या २२/९/२०२१च्या पत्रानुसार सदर नेत्र तपासणी शिबिराला काही कारणांमुळे स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे सदर स्थगिती तात्काळ उठवून सदर नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संध्याताई गुरनुले यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केलेली आहे.

गेल्या अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग,चंद्रपूर तर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते,त्यामुळे सदर शिबिराला लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील गरजू नागरीक उत्सुक होते,तशी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती करून माहिती देण्यात आलेली होती त्यानुसार तयारीसुद्धा करण्यात आलेली होती,पंरतु ऐनवेळी वेळी शिबिराचे आयोजन रद्द करण्यात आले त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली,त्यामुळे अनेक नागरीक सदर शिबिरापासून वंचित राहिले,परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना सदर शिबिराचा लाभ व्हावा यादृष्टीने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात यावे याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निर्देश द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संध्याताई गुरनुले यांच्याकडे केलेली आहे.