सावली शहरातील प्रकार
कंत्राटदाराचा बळजबरीपणा
पावसाळ्यात शहराला पुराचा धोका
सावली: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 चे काम सावली शहरातून मागील एक महिन्यापासून सुरू आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करणे अपेक्षित असताना संबंधित कंत्राटदाराने नालीचे बांधकाम न करताच बळजबरीने महामार्गाच्या कामाला सुरूवात केल्याने पावसाळ्यात शहराला पुराचा धोका होण्याची शक्यता बळावली आहे.

सावली शहरातून जाणाऱ्या महामार्गावर भूमिगत विद्युत वाहिनीचे काम केल्या नंतरच महामार्गाचे काम करणे अपेक्षित होते. त्यातच महामार्ग बांधकाम विभागानुसार शहरातून गेलेली भूमिगत विद्युत वाहिनी तसेच पाणी पुरवठा जलवाहिनी महामार्गाच्या कामात अडसर ठरत आहे. त्यामुळे प्रस्तावित महामार्गाचे काम सुरू होणार असल्याची सूचना संबंधित विभागाला देणे गरजेचे असतानाही कोणत्याही सूचना न देता शहरातून बळजबरीने महामार्गाच्या कामास सुरुवात करून शहरातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सांड पाण्याचा विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम सुरू असताना नळाची जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने कामाचा दर्जा खालावत आहे त्यामुळे महामार्गाचे काम मजबूत होणार की नाही? यात मात्र शंकाच आहे.
गडचिरोली ते मूल या 45 किमी अंतर असलेल्या महामार्गावर प्रत्येक गावात नाल्याची व्यवस्था करणे यास प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. परंतु सावली शहरात नालीचे बांधकाम न करतात संबंधित कंत्राटदाराने बळजबरीने महामार्गाच्या कामाला सुरुवात केल्याने पावसाळ्यात शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन महामार्गालगत असलेल्या घरांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सावली शहरातून नाल्यांच्या बांधकामा नंतरच महामार्गाचे काम सुरू करावे अशी मागणी सावली करांत कडून होत आहे.