Monday, May 27, 2024
Homeचंद्रपुरडॉ. उपेंद्र कोठेकरांच्या कवितेत सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब -देवेंद्र फडणवीस

डॉ. उपेंद्र कोठेकरांच्या कवितेत सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब -देवेंद्र फडणवीस

◻️▪️डॉ. कोठेकरांची कविता माणसांच्या गर्दीत स्फूरलेली – सुधीर मुनगंटीवार

नागपूर▪️

कविता ही मानवी संवेदना आहे. तिचा प्रत्यय काळाप्रमाणे बदलत असतो. आपण ज्या मानसिकतेत असतो त्यानुसार आपल्याला त्या कवितेचा प्रत्यय येत असतो. डॉ. उपेंद्र कोठेकर हे एक सिद्धहस्त कवी आहेत आणि त्यांच्या कवितेत सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब जागोजागी बघायला मिळते, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या ‘दिक्कालाच्या मांडवात’ व ‘काठावर दूर नदीच्या’ व डॉ. मनीषा कोठेकर यांच्या ‘उंबरठ्यापल्याड’ या लेख संग्रहाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उर्मिला आपटे, श्याम धोंड, दिवाकर निस्ताने, चंद्रकांत लाखे, उपेंद्र कोठेकर, मनीषा कोठेकर, मोरेश्वर निस्ताने यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात ना .सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘सहसा कविता म्हटल्यावर ती झाडा-फुलांमध्ये, वनांमध्ये रमलेली असते. पण डॉ.उपेंद्र कोठेकर यांची कविता माणसांच्या गर्दीमध्ये स्फुरलेली आहे.’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला जसा गर्दीचा विक्रम आज झालेला आहे, तसाच पुस्तक खरेदी करण्याचाही विक्रम करावा, असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पुढे म्हणाले, ‘कविता तोच रचू शकतो ज्याच्या मनात प्रेम आहे. डॉ.उपेंद्र यांच्या मनात प्रेम असल्यामुळेच ते या कवितांची निर्मिती करू शकले. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम करताना जसे कार्यकर्त्यांचे संघटन केले तसेच शब्दांचेही उत्तम संघटन त्यांनी कवितेच्या माध्यमातून केले आहे.’ या कार्यक्रमाला विदर्भातील खासदार, आमदार, पक्षातील प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

▪️◻️कविता आणि कोट्या◻️▪️
यावेळी ‘कधी गुच्छ कधी गोटा’, ‘सुमारांची गर्दी झाली बेसुमार’, ‘तुम्ही माय बाप व्हावे कृपावंत’ या काही रचनांचा उल्लेख करीत ना. मुनगंटीवार यांनी यातील ओळींना राजकीय संदर्भ जोडत कोट्याही केल्या. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला.

▪️◻️नरेंद्रजी, देवेंद्रजी आणि उपेंद्रजी▪️◻️
‘कवी आणि कवितेप्रमाणे क्रांतीचाही ‘क’ असतो. उपेंद्र यांच्या कवितांमधून त्याचाही प्रत्यय कदाचित येईल. पण एक उत्तम असा योगायोग आहे. तो म्हणजे देशाचे नेतृत्व करणारे लोकनायक नरेंद्र मोदी हे सुद्धा कविता करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा कविता लिहीतात आणि आमचे उपेंद्रजी सुद्धा कविता लिहीतात,’ असा उल्लेख करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular