सांडपाण्यावर प्रक्रिया करून होणार वापर
विदर्भ कल्याण/जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर- शहर महापालिकेच्या माध्यमातून जलप्रदूषण रोखण्यासाठी ” माझी वसुंधरा अभियाना ” अंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे . या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी ” रेड टँकर ” ही अभिनव योजना अंमलात आणण्यात आली असून , त्याचा शुभारंभ बुधवार , दिनांक २६ जानेवारी रोजी महापौर सौ . राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते झाला .
अंचलेश्वर गेट रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपमहापौर राहुल पावडे , सहायक आयुक्त विद्या पाटील , बांधकाम शहर अभियंता महेश बारई , उपअभियंता विजय बोरीकर , यांत्रिकी विभागाचे रवींद्र कळंभे यांची उपस्थिती होती . सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपामार्फत हमतनगर परिसरात २५ एमएलडी क्षमतेचे तर पठाणपुरा परिसरात ४५ एमएलडी , तर आझाद बगीचा येथे ५ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आहे . हे पाणी घरगुती व खासगी इमारत बांधकाम आणि अन्य कामासाठी , झाडांसाठी , चौक सौंदर्यीकरण , शौचालय , कारखाने आदी ठिकाणी वापरता येऊ शकते . मनपाच्या टँकरद्वारे ४०० रुपये प्रति टँकर , तर संबंधितांच्या टँकरला १५० रुपये प्र टँकर प्रमाणे पाणी देण्यात येणार आहे .