Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रसावधान ! आपली बेफिकीरी म्हणजे तिस-या लाटेला आमंत्रण

सावधान ! आपली बेफिकीरी म्हणजे तिस-या लाटेला आमंत्रण


जगासाठी २०२० हे वर्ष कोरोना विषाणू संसर्गाचं संकट घेऊन अवतरलं. महाराष्ट्रात २०२० च्या मार्चमध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. टाळेबंदी हा आजाराला प्रतिबंध करण्यासाठी अवलंबण्याचा एक पर्याय असतो या गोष्टीचा अनुभव प्रथमच सर्वांनी घेतला. काही दिवसांच्या किंवा महिन्यांच्या टाळेबंदीने कोरोना संकटातून आपण बाहेर येऊ अशी अपेक्षा असतानाच त्या वेळी विस्कळीत झालेले जनजीवन आज तब्बल दीड वर्षांनंतरही पूर्ववत होण्याचे लक्षण दिसत नाही. विषाणू संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशासमोर कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आ वासून उभे आहे. तिसरी लाट नेमकी कधी येणार, येणार तेव्हा तिची तीव्रता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल की अधिक, तिसऱ्या लाटेचा संसर्ग झाल्यास रुग्णांना लक्षणे नेमकी काय असतील, मृत्यूचे प्रमाण कमी असेल किंवा अधिक आणि महत्वाचे म्हणजे सध्या आपण घेत असलेली कोरोना प्रतिबंधक लस तिसऱ्या लाटेतील संसर्गाचा प्रभाव रोखणार की नाही, असे अनेक प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहेत. महाराष्ट्रातही आता डेल्टा प्लसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.


संसर्गाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेक शहरांसह राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे कोरोना संसर्गाचे संकट कायमचे संपल्याप्रमाणे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. मास्कचा वापर, सामाजिक अंतर, तातडीचे कारण असल्याशिवाय घराबाहेर न पडणे या सूचनांकडे थेट कानाडोळा करून सणसमारंभ, राजकीय सभा, सोहळे अशा गोष्टी सुरू झाल्या. त्याचे पर्यावसन म्हणून २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. वाढत्या रुग्णसंख्येने हळूहळू लाटेचे स्वरूप धारण केले आणि पहिल्या लाटेच्या तीव्रतेचे सर्व उच्चांक मोडून काढत दुसऱ्या लाटेने राज्यासह देशाला हादरवले. सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा, औषधे, प्राणवायू, रुग्णालये या सगळ्यांचा तुटवडा अनुभवल्यानंतर अखेर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने थोडा दिलासा मिळाला, मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा आपण तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्याच्या तयारीला लागलो आहोत. बाहेर वावरण्याचे बहुतांश निर्बंध उठवण्यात आल्याने रुग्णवाढ सुरू झालीच तर तिची तिसरी लाट येण्यास फार वेळ लागणार नाही, हे उघड आहेच. त्यामुळेच सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळत राहणे हे सर्वाधिक महत्वाचे आहे.
कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तनातून सुरू झालेला डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग हा जगातील अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशियात ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर सुरुवातीला केवळ भारतात आढळलेल्या ‘डेल्टा विषाणू’चे रुग्णही आता ८० देशांमध्ये आहेत आणि सध्या त्याने ब्रिटन मध्ये हाहाकार माजवला आहे, जिथे केवळ ११ दिवसात याची प्रकरणे दुप्पट झाली आहेत. उत्परिवर्तनातून तयार झालेल्या ‘डेल्टा प्लस’ सारख्या विषाणू संसर्गक्षमतेवर नियंत्रण ठेवणे अवघड असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक पारंपरिक नियम पाळत राहणे अत्यावश्यक असल्याचा पुनरुच्चार सर्व स्तरांतील तज्ञ करतात. मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि वेगवान लसीकरण केले तर तिसरी लाट रोखणे शक्य असल्याचे मत देशाच्या कोरोना कृतीगटाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी अलीकडेच व्यक्त केले आहे. त्यामुळे मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता, गर्दी टाळणे यांसह लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
डेल्टाप्रमाणे डेल्टा प्लसच्या संक्रमणाचा वेग अधिक राहिला तर त्यामुळेही तिसरी लाट अधिक गंभीर होण्याचा धोका राहतो. टाळेबंदीतील नियम शिथिल झाले की साथरोग संपल्याप्रमाणे नागरिकांचे वर्तन असते. आताही पर्यटन स्थळांवर आणि बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी करणारे नागरिक हेच पुन्हा दर्शवत आहेत. प्रशासनाच्या नाकाखाली कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवले जात आहेत. मागील दोन लाटांकडे बघून आपण शिकलो नाही असेच आता म्हणावे लागत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी अत्यंत महत्वाचा उपाय असलेल्या लसीकरणाची संथगती ही देखील या काळात चिंतेची बाब ठरत आहे. लसीकरण मोहीम हाती घेतल्यानंतर तिचा वेग अपेक्षेएवढा नाही. लशीचा पुरवठा सुरळीत राखणे, लसीकरणाच्या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ न देणे याबाबी महत्वाच्या आहेत. को-विन संकेतस्थळावरील नोंदणीची अट शिथिल करण्यात आली असली तरी ते करण्यातही बराच विलंब लागल्याने लसीकरण रखडणे अशा बाबी साथरोगाच्या काळात योग्य नाही.
महाराष्ट्राच्या अनेक भागांत आजही दुसरी लाट सुरू आहे. तिचा आलेख ओसरलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेवर पूर्ण नियंत्रण आणण्याआधीच आपण तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा करत आहोत, असे दिसते. शहरी भागात दुसरी आणि तिसरी लाट एकमेकींत मिसळण्याची शक्यता आहे, त्याच वेळी ग्रामीण भाग अद्याप दुसऱ्या लाटेतून सावरण्याचेच चिन्ह नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. डेल्टा प्लस या नव्या उत्परिवर्तनाचा धोकाही मोठा असल्यामुळे कोणताही बेजबाबदारपणा आपल्याला परवडणारा नाही असे चित्र आहे. साथीचे चित्र आटोक्यात आणायचे तर वेगवान लसीकरणाला पर्याय नाही.
एकीकडे संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी लढत असताना, इस्त्रायल या देशाने स्वत: कोरोनापासून मुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. कोरोनामुक्त होणारा इस्त्रायल हा जगातील पहिलाच देश आहे. आपल्या ८० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने इस्त्रायल सरकारने मास्क वापरण्यावरिल निर्बंध आता हटवले आहेत. इस्त्रायल सोबत अमेरिकेच्या अधिकतर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने आता तेथील नागरिकांना एकटे चालताना किंवा वाहन चालवताना मास्क वापरण्याची गरज नाही. या दोन देशांसोबत केवळ दोन आठवडयांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण करणारा भूतान, चीन आणि न्यूजीलंड या देशांमध्ये कोरोना नियमांमध्ये शिथिलता आली आहे.
जगातील इतर देशांप्रमाणे लसीकरणाचा वेग राखणेही भारतात फारसे साध्य होताना दिसत नाही. भारतात आजही एक अरब लोक लसीकरणापासून वंचित आहेत. आत्तापर्यंत २५ कोटी लोकांना लसीचा पहिला डोस तर ५ कोटीहून अधिक लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे वरील देशांप्रमाणे कोरोना महामारी विरुद्धच्या युद्धात विजयाची घोषणा करण्यास भारताला वेळ लागेल. त्या पार्श्वभूमीवर आता डेल्टा प्लसचे संकट समोर उभे राहिले आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीला आजार नवा, त्याची लक्षणे नवी, त्यावर उपचारही नवे- त्यामुळे दिसेल त्या लक्षणावर उपचार आणि प्रयोग हा महासाथ हाताळण्याचा प्रमुख गाभा ठरला. निर्बंध उठल्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहेच. हे रुग्ण डेल्टा प्लस उत्परिवर्तनाचे असल्यास त्याचा प्रसार रोखण्याचे शिवधनुष्यही पेलायचे आहे. आपण जर असेच गाफिल राहिलो तर तीन महिन्यानंतर येणारी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ६ ते ८ आठवड्यातच येवू शकते. संसर्गाचा म्यूटंट पसरला तरी तिसरी लाट येवू न देणे हे आपल्या हातात आहे. या सर्व गोष्टी आपले वर्तन आणि रोगप्रतिकारक शक्ती यावर अवलंबून आहेत. आरोग्य व्यवस्था आणखीन सक्षम करण्याबरोबरच प्राप्त परिस्थितीत मास्कचा कटाक्षाने वापर करणे, हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता, तसेच गर्दी टाळणे, शारीरिक अंतर राखणे आणि मिळेल ती लस तातडीने घेणे या सूत्रांची अंमलबजावणी तातडीने केली नाही, तर कोरोनाची तिसरी लाट आपल्या उंबरठय़ाच्या आत कधी येईल, ते आपल्याला कळणारही नाही. कोरोनाची दाहकता मी स्वतः खूप जवळून अनुभवली असल्याने, जगात ज्या लाखो लोकांचा बळी या महामारीने घेतलाय त्यात माझ्या काही स्वकीयांचा समावेश असल्याने हा लिहिण्याचा प्रपंच. शेवटी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करायच की आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा हे आपणच ठरवायचय.
– सुरेश मंत्री,अंबाजोगाई.
संपर्क- ९४०३६५०७२२.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular