Tuesday, October 3, 2023
HomeSportsशेतक-याच्या पोरानं घडवला इतिहास ; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला !

शेतक-याच्या पोरानं घडवला इतिहास ; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला !


भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे, यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने २००८ मध्ये नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले होते. त्यानंतर अशी कामगिरी कोणालाही करता आली नव्हती. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. पण, अॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील १२५ वर्षांचा भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. नीरजच्या या सुवर्णपदकामुळे टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या पदकांची संख्या ७ इतकी झाली आहे. यामुळे ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद झाली आहे.

भारताने याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये ६ पदक जिंकली होती. ती कामगिरी भारताने मागे टाकली आहे.
भारताचा नीरज चोप्रा हा भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात दाखल झाला होता आणि त्याच्याकडून आज सुवर्णपदकाची अपेक्षा होती. भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेल्या नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. नीरजने पहिल्याच फेरीत ८७.०३ मी. एवढ्या लांब भाला फेकला आणि तो आता पदक पटकावणार, असे सर्वांनाच वाटत होते. कारण पात्रता स्पर्धेपेक्षा त्याची ही कामगिरी नक्कीच उजवी होती. दुसऱ्या फेरीत तर नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकला आणि जवळपास पदक निश्चित केले होते. तिसऱ्या फेरीत नीरजने ७६.७९ मीटर भाला फेकला होता, पण दुसऱ्या फेरीतील त्याची कामगिरी सर्वोत्तम होती. चौथ्या फेरीत नीरजचा फाऊल झाला होता, पण तरीही तो अव्वल स्थानावरच होता.
यापूर्वी झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर थ्रोसह अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे त्याच्याकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. नीरजला यावेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून कडवी झुंज मिळेल, असे दिसत होते. नीरजला पाहूनच अर्शद हा भालाफेक या क्रीडा प्रकारात वळल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पाकिस्तानचा नदीम यापूर्वी क्रिकेट खेळायचा, पण त्याने हा खेळ सोडून अॅथलेटिक्समध्ये नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नदीमने सांगितले होते की, नीरजला पाहूनच त्याने भालाफेक खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याच्याकडून प्रेरणा घेऊन अर्शदने भालाफेक खेळायला सुरुवात केली होती. आता नीरज आणि अर्शद हे दोघे एकमेकांसमोर ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून शिक्षण आणि खेळाची सांगड घालत नीरज हे नाव कमावलं आहे. नीरज चोप्राचा जन्म २७ डिसेंबर १९९७ ला हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातल्या खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. नीरजने आपलं शिक्षण चंडीगढमधून पूर्ण केलं. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. लहानपणी त्याला खेळण्यासाठी मैदानही नव्हत मग भालाफेकीचा प्रश्नच नाही. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं मुलांसोबत क्रिकेट खेळत होता परंतु २०११ मध्ये त्याची भालाफेक या खेळाशी ओळख झाली. २०११ मध्ये पानीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात त्याचे काका त्याला घेऊन गेले. तेंव्हा तो १३ वर्षांचा होता आणि त्याचे वजन जवळपास ७७ किलो इतके होते. तेथे त्यानं भालाफेकपटूंकडून काही टिप्स घेतल्या आणि काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्यानं जिल्हा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. खेळासाठी त्यानं कुटुंबीयांना भारतीय क्रीडा प्राधिकरणात राहण्याची परवानगी मिळावी यासाठी तयार केले. तेंव्हा तो फक्त १४ वर्षांचा होता. अथक मेहनत व कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव गाजवले. जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला. तो सध्या जर्मनीच्या क्लॉस बार्तोनिएत्झ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. याआधी त्यानं गॅरी कॅल्व्हर्ट, वेर्नेर डॅनिएल्स आणि उवे होहन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. नीरजने आत्तापर्यंत पाच मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यात आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ज्युनियर चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकांचा समावेश आहे. २०१६ मध्ये भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावलं होत. त्यानंतर २०१६ मध्येच त्यानं २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकताना ८६.४८ मीटर लांब भालाफेक करून २० वर्षांखालील गटात वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक स्तरावरच्या अॅथलेटिक स्पर्धेत पदक पटकवणारा नीरज दुसरा भारतीय ठरला होता. या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
२०१८ मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता इथं एशियन्स गेम्समध्ये नीरजने ८८.०६ मीटर दूर भालाफेक केला होता. या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर २०१८ मध्ये नीरजच्या खांद्याला दुखापत झाली होती. या कारणाने तो अनेक दिवस खेळापासून दूर होता. २०१९ मध्ये त्याला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्याला अनेक स्पर्धांपासून मुकावं लागलं होतं. ३१ मार्च २०२० ला त्यानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान सहाय्यता निधीत २ लाखांची मदत केली होती.
यावर्षी मार्च महिन्यात पुनरागमन करताना नीरजने इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत ८८.०७ मीटर भाला फेकत स्वतःचाच नॅशनल रेकॉर्ड तोडला होता. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या निवड चाचणीत नीरजने ८७.८६ मीटर भालाफेक केला होता. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्यासाठी ८५ मीटर भालाफेक करणं आवश्यक होतं. त्यानंतर आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं तब्बल ६ कोटी रुपयांचं बक्षीस नीरजला जाहीर झालं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. नीरज चोप्रानं मिळवलेलं सुवर्णपदक कायम लक्षात ठेवलं जाईल. टोकियोमध्ये इतिहास लिहीला गेला. त्यानं अतुलनीय खेळ केला. सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. भारतासाठी सुवर्णमय कामगिरी केल्याबद्दल नीरज चोप्राच अभिनंदन !
– सुरेश मंत्री, अंबाजोगाई
संपर्क – ९४०३६५०७२२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular