भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील ४१ वर्षापासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. गुरुवारी कांस्य पदकासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारताने जर्मनीचा ५-४ ने पराभव करून ऐतिहासिक असा विजय मिळवला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. या विजयानंतर संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी कर्णधार मनप्रीत सिंगने आणखी एक वाखाणण्याजोगी कृती करत हे पदक कोविड योद्ध्यांना समर्पित केल्याची प्रतिक्रिया केली. आनंदाच्या, जल्लोषाच्या वातावरणातही संवदेनशीलता जपत सिंगने ही प्रतिक्रिया दिली हे विशेष.
एकेकाळी ऑलिम्पिक खेळांच्या हॉकी स्पर्धांवर भारतीय पुरुषांचे एकहाती वर्चस्व होते. सलग काही वर्षे सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाला १९८० नंतर मात्र एकही पदक पटकावता आले नाही. सेमीफायनलपर्यंत देखील धडक न मारता आल्याने भारतीय हॉकी संघ गेल्या ४१ वर्षांपासून पदकाची वाट पाहत होता. पण यंदा भारतीय संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये थोडक्यात पराभव झालेल्या भारतीयांनी तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात कोणतीच चूक न करता जर्मनीला नमवत कांस्य पदक जिंकलं.

या पदकासाठी संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली पण एका खेळाडूने सर्वाधिक उत्कृष्ट खेळ करत कास्यं पदक भारताच्या गळ्यात घातलं. अवघ्या एका गोलच्या फरकाने भारताने विजय मिळवला असला तरी जर्मनीची बरीच तगडी आक्रमणं नाकाम करण्यात महत्वाचा वाटा होता तो भारताचा गोलकिपर पी.आर.श्रीजेश याचा. श्रीजेशने संपूर्ण सामन्यात अगदी एका संरक्षक भिंतीप्रमाणे कामगिरी करत जर्मनीला भारतावर आघाडी घेऊ दिली नाही. त्यामुळे भारताच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा ठरला. संपूर्ण टोक्यो ओलिम्पिकमध्ये श्रीजेशने अनेक गोल अडवले आहेत. गोलकीपर पी.आर. श्रीजेशने क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ब्रिटेन विरुद्ध केलेल्या शानदार गोलकिंपिंगमुळे तो सामना जिंकण्यात भारताला यश आलं होत. आज जर्मनी विरुद्ध देखील त्याने तब्बल ९ शानदार सेव्ह केल्या. भारत आणि जर्मनी यांच्यातील सामन्या दरम्यानही शेवटच्या मिनिटांत जर्मनीला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. जर्मनीने हा गोल करताच त्यांनी सामन्यात बरोबरी साधली असती. पण याच वेळी श्रीजेशने अप्रतिम सेव्ह करत भारताचा विजय पक्का केला. संपूर्ण टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेसह अंतिम सामन्यात श्रीजेशने आपल्या संपूर्ण अनुभवाचा फायदा घेत उत्कृष्ट गोलकिंपिंग केली. अंतिम सामन्यात जर्मनी संघाला १३ कॉर्नर मिळाल्या ज्यातील केवळ एकच कॉर्नर गोलमध्ये बदलण्यात जर्मनीला यश आलं. बाकी सर्व वेळी श्रीजेशने गोलपोस्टमध्ये भिंत बनून उभा होता. जवळपास १३ वर्षे संघासाठी खेळणाऱ्या श्रीजेशने भारतीय संघाला अनेक अप्रतिम विजय मिळवून देत स्वत:ला एक अप्रतिम गोलकिपर म्हणून सिद्ध केलं आहे. २०१४ च्या आशियाई खेळात सुवर्णपदक, कॉमनवेल्थ खेळात रौप्यपदक अशा एक न अनेक भारतीय हॉकी संघाच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे.
हा आनंद मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी केली. पण संघातील ९ धुरंदर फॉरवर्ड खेळाडूंनी दागलेले २३ गोल भारतीय प्रेक्षक कधीच विसरु शकत नाही. संपूर्ण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेले २३ गोलच विजय मिळवून देण्यात महत्वाचे ठरले. या २३ गोलमधील १३ गोल ग्रुप स्टेजमधील ५ सामन्यात ठोकले. त्याच्या जोरावरच ५ पैकी ४ सामने भारत जिंकला. ज्यानंतर नॉकआउट स्टेजमध्ये भारताने १० गोल केले. टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताकडून गोल करण्यात सर्वात मोठं योगदान दिलं ते हरमनप्रीत सिंगने. त्याने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गोल केले. संघाने केलेल्या २३ गोलमधील अर्धा डजन गोल एकट्या हरमनप्रीतने केले. त्याने स्पर्धेत तब्बल ६ गोल केले. हरमनप्रीत पाठोपाठ रूपिंदर पाल सिंगने ज्याला भारताचा ड्रॅग फ्लिक स्पेशालिस्ट म्हटलं जात, त्यानेही स्पर्धेत ४ गोल केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिमरनजीत असून त्याने स्पर्धेत ३ गोल केले. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर दिलप्रीत, हार्दिक आणि गुरजंत हे तिघे असून त्यांनी प्रत्येकी २-२ गोल करत संघाला योगदान दिलं. यांच्याशिवाय कर्णधार मनप्रीत सिंग, विवेक प्रसाद आणि वरूण कुमारनेही १-१ केला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक यांच्याशी बातचित केली. यावेळी त्यांनी कर्णधार मनप्रीतचं विशेष कौतुक करत ‘तू इतिहास लिहिलास’ अशा शब्दात त्याचं कौतुक केलं. तसेच बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर शांत झालेला मनप्रीत आज मात्र जोशपूर्ण दिसून आला असंही मोदी यांनी नमूद केलं. त्यांनी इतर खेळाडूंशी देखील बातचीत करत त्यांचही अभिनंदन केलं.
या विजयानंतर भारतीयांमध्ये एक वेगळाच आनंद दिसत आहे. काहींनी तर क्रिकेट विश्वचषकापेक्षा हा मोठा विजय असल्याच म्हटलं आहे. हॉकी हा देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याने हा विजय सर्वांसाठीच महत्वाचा आहे. त्यामुळे हा अनमोल विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंवरही कौतुकांचा वर्षाव होत असतानाच पंजाब सरकारने हॉकी संघात खेळणाऱ्या त्यांच्या राज्यातील खेळाडूंना तब्बल १ कोटी रुपयांचं रोख बक्षिस जाहिरं केलं आहे. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर एतिहासिक कामगिरी करणा-या भारतीय पुरूष हॉकी संघाचे अभिनंदन !
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क- ९४०३६५०७२२.