Tuesday, June 28, 2022
HomeSportsअलविदा मिल्खा सिंह !

अलविदा मिल्खा सिंह !


भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे शुक्रवार १८ जुन रोजी निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. ते आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आले नव्हते. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख नावाने प्रसिद्ध होते.राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंह यांनी जिंकून दिले होते.

भारताकडून पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं २० मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र त्यांना २४ तारखेला मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले. त्यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. १३ जुन रोजी कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या इतर काही समस्यांमुळं त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांच्या पथकानं अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना वाचवता आलं नाही.
पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांच्या उपस्थितीत भारत-पाकिस्तान दरम्यान एक महत्त्वाची स्पर्धा सुरू होती. सर्वांचे लक्ष लागले होते, ते मिल्खा सिंग आणि अब्दुल खलीक यांच्यावर. अब्दुल हा पाकिस्तानचा महान धावपटू होता. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नवनवे विक्रम रचून त्याने पाकिस्तानचे नाव उंचावले होते. त्या दिवशी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिल्खा सिंगने आशियाच्या सर्वांत जलद धावपटू अब्दुल खलीक यांना मागे टाकले, असे म्हणतात की त्या दिवशी मिल्खा धावलाच नाही तो उडत होता. या तरुण शिखाकडून जनरल अयुब खान एवढे प्रभावित झाले की त्यांनी मिल्खाला ‘द फ्लाईंग सिख’ असे नाव दिले. त्या दिवशी क्षितिजावर मिल्खा सिंहचा उदय झाला आणि अब्दुलचा अस्त झाला. त्या एका पराभवाने अब्दुल खलीक कायमचा विस्मृतीत ढकलला गेला.
मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबच्या गोविंदपूरा मध्ये झाला. फाळणीच्या नंतर हे शहर आता पाकिस्तानात आहे. भारताचे ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिल्खा सिंह यांना मिळाली होती. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंह यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६ सेकंदात पूर्ण केली. १९६२ मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंह यांनी ४०० मीटर आणि ४×४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९५८ च्या कार्डिफ कॉमनवेल्थ गेम्समध्ये मिल्खा सिंह यांनी ४४० यार्ड मधील तत्कालीन विश्वविक्रम धारक माल्कम स्पेन्सला हरवुन जागतिक स्तरावर भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते. एका वृत्तानुसार जेंव्हा इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथने मिल्खा सिंहला सुवर्णपदक दिले तेंव्हा ब्रिटन मधील तत्कालिन भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी मिल्खा सिंह यांना आनंदाने मिठी मारली होती. यानंतर मिल्खा सिंह यांना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना विचारले आहे की तुम्हाला काय बक्षीस हवे? तेव्हा त्यांना कळत नव्हते की काय मागितले पाहिजे. तेंव्हा त्यांनी दिल्लीत एक घर मागितले असते. पण तेंव्हा त्यांनी संपूर्ण देशात एका दिवसाची सुट्टी मागितली. त्यांचे भारतात आगमन झाल्यानंतर दिल्या आश्वासनाप्रमाणे पंडित नेहरूंनी संपूर्ण देशभरात एक दिवसाची सुट्टी जाहीर केली होती.
मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमाही आला होता. हा त्यांचा चरित्रपट होता. अभिनेता फरहान अख्तरने यामध्ये मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली होती. स्वतः मिल्खा सिंह यांची त्याने भेटही घेतली होती आणि हा सिनेमा त्यांनाही आवडला होता.
मिल्खा सिंह यांचे खेळातील योगदान / पुरस्कार
१.२०० मी आणि ४०० मी धावण्याच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व
२.१९५८ च्या कार्डिफ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक
अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू  
३.आशियाई स्पर्धेत ४ सुवर्णपदक.
४.१९४६, १९६०  आणि १९६४ सालच्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व 
५.१९६० च्या रोम ऑलम्पिकच्या ४०० मी च्या अंतिम सामन्यात थोडक्यात पदक हुकलं 
६. १९५९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मान
स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीदरम्यान उसळलेल्या दंगलीत मुलतानजवळील लायलूर गावात आई-वडिलांची झालेली हत्या.. वडिलांचे कानावर पडलेले ‘भाग मिल्खा भाग’ हे शब्द.. रात्रभर पळत पळत स्वत:ची केलेली सुटका.. समोर मृत्यू दिसत असताना महिलांच्या डब्यातून लाहोरमार्गे गाठलेली दिल्ली.. खडतर परिस्थितीत घालवलेले दिवस.. सेनादलात सामील झाल्यानंतर घेतलेले परिश्रम.. राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये केलेली देदीप्यमान कारकीर्द.. पाकिस्तानात मिळवलेली ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी.. रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाने एका सेकंदाने दिलेली हुलकावणी.. महान धावपटू मिल्खा सिंह यांचा हा खडतर संघर्ष. अशा या महान खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली !
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२

Previous article20/06/2021
Next article21/06/2021
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

2 COMMENTS

Most Popular