Tuesday, April 16, 2024
Homeवर्धावर्धा जिल्ह्यात लसीकरणास प्रारंभ

वर्धा जिल्ह्यात लसीकरणास प्रारंभ

बालरोग तज्ञ डॉ सुनीता दीक्षित ठरल्या लसीकरणाच्या पहिल्या मानकरी जिल्ह्यात 6 केंद्रावर आरोग्य सेवेतील 600 कर्मचाऱ्यांना लसीकरण

वर्धा :- कोरोनावर विजय मिळविण्यासाठी आज संपूर्ण देशात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा शुभारंभ झाला.

वर्धा जिल्ह्यात आज खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमचा श्रीगणेशा करण्यात आला. सामान्य रुग्णालय वर्धा येथील बालरोग तज्ञ डॉ सुनीता दीक्षित यांना लसीककरणातील पहिल्या लाभार्थी होण्याचा सन्मान मिळाला. खासदार श्री तडस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ विजय जांगळे, तसेच रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेस यांच्या उपस्थिती होती. लसीकरण मोहिमेची प्रक्रिया व्यवस्थित पार पडतेय का यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक आरोग्य अधिकारी नेमण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात यासाठी डॉ विजय डोईफोडे उपस्थित होते. लसीकरणानंतर डॉ दीक्षित यांना अर्धा तास निगरानीखाली ठेवण्यात आले. यादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. डॉ सुनीता दीक्षित यांनी लसीकरणातील पहिल्या लाभार्थी ठरल्याबाबत आनंद व्यक्त केला. कोरोना योद्धा म्हणून पुन्हा नव्या जोमाने काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

खासदार रामदास तडस यांनी गेल्या 10 महिन्यांपासून देश कोरोनाशी लढत आहे. आपल्या देशाने कोरोनाची लस निर्माण करून ती आज देशवासियांना उपलब्ध झाली असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पहिल्या लाभार्थी ठरलेल्या डॉ सुनीता दीक्षित यांचे त्यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्यात पहिल्या दिवशी 600 व्यक्तींना लस

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम, सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, आर्वी व हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय आणि सेलू येथील ग्रामीण रुग्णालय या सहा केंद्रावर आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 600 व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असून यामध्ये डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार अशा विविध कोरोना योध्याचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी , दुसऱ्या टप्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी, कामगार , पोलीस आदी, तर तिसऱ्या टप्यात 50 वर्षांवरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षांखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब)असणारे नागरिक यांना लस देण्यात येणार आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular