Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या तिस-या लाटेबद्दलच्या सांशकता

कोरोनाच्या तिस-या लाटेबद्दलच्या सांशकता


कोरोनाच्या दोन लाटा परतवून लावल्यानंतर आता देशभरात तिस-या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ६ ते ८ आठवड्यात या साथीची तिसरी लाट येईल व तिला थांबवणे अशक्य असल्याचे विधान एम्सचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी केले आहे. पहिल्या लाटेत वृद्ध तर दूस-या लाटेत तरूणांना अधिक झळ पोहचली होती.या तिस-या लाटेचा सर्वाधिक धोका तरुण व लहान मुलांना बसणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबतीत प्रसार माध्यमांमधुन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. ‘माझी मुले- माझी जबाबदारी’ ही नविन संकल्पना याअनुशंगानेच अस्तित्वात आली आहे. या लाटेचा कसा आणि किती प्रमाणात लहान मुलांना फटका बसेल याचा अभ्यास केला जात आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी खरंच घातक सिद्ध होईल की नाही हे अजुनही सुस्पष्ट झालेले नाही. याबाबत संशोधक आणि विशेषज्ञ दररोज वेगवेगळे दावे करत आहेत.


दुसऱ्या लाटेप्रमाणेच भारतामधील कोरोनाची तिसरी लाट ही अधिक घातक असू शकते. देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम होतील अशी शक्यता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआयने) नुकत्याच जारी केलेल्या आपल्या अहवालामध्ये व्यक्त केली आहे. एसबीआयच्या या अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट १०८ दिवसांपर्यंत होती, त्या देशांमध्ये तिसरी लाट सरासरी ९८ दिवसांपर्यंत टिकली. तसेच इतर देशांमधील ट्रेण्ड पाहिल्यास तिसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेपेक्षा १.८ पट अधिक रुग्ण आढळून येतील. जागतिक स्तरावर दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा ५.२ पट अधिक रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ४.२ टक्के अधिक रुग्ण आढळून आलेले. ही सरासरी जागतिक सरासरीपेक्षा कमी होती.
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये येऊन गेलेल्या तिसऱ्या लाटांचा अभ्यास केला असता भारतामधील तिसरी लाट अधिक धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण त्याचवेळी कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी चांगल्या पद्धतीने, सुनियोजित कार्यपद्धतीचा अवलंब करत तयारी करण्यात आली तर या लाटेचा धोका आणि परिणाम कमी करण्यात यश मिळू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. गंभीर प्रकरणांची संख्या तसेच मरण पावणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी पूर्ण तयारीने या लाटेचा सामना करणे गरजेचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. चांगल्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था, काम करण्यासाठी मूलभूत सुविधा आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. गंभीर रुग्णांची संख्या या दोन गोष्टी केल्यास २० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिल्यास परिस्थिती दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक चांगली असू शकते. एक लाख ७० हजार जणांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू झाला आहे. पण आरोग्य सुविधा आणि लसीकरणाच्या जोरावर तिसऱ्या लाटेतील मृतांची संख्या ४० हजारांवर थोपवता येईल, असे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.
लहान मुलांसाठी तिसरी लाट ही धोकादायक ठरु शकते, असे एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्वात आधी लहान मुलांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशामध्ये १५ ते १७ कोटी मुले ही १२ ते १८ वयोगटातील असून त्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे लसीकरणामध्ये या मुलांना प्राधान्य दिले जावे, असे एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.
दूसरीकडे नुकतच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि एम्सचे एक नविन सर्वेक्षण समोर आले आहे. त्यानुसार, कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका लहान मुलांमध्ये कमी असण्याची शक्यता आहे. लहान मुलांमध्ये सार्स कोवि-२ सीरो पॉझिटिव्हिटिचा दर वयस्क व्यक्तींच्या तुलनेत जास्त आहे. म्हणूनच तिस-या लाटेमध्ये या विषाणूचा लहान मुलांना धोका कमी असल्याचे म्हटले आहे. सध्या देशात याविषयीचा अभ्यास सुरू असून अंतिम टप्प्यात हा दावा करण्यात आला आहे. सोबत आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पत्रिका लैनसेटचा अहवालही असाच आहे. या अहवालानुसार असे कोणतेही ठोस पुरावे भेटलेले नाही ज्यांच्या आधारावर कोरोनाच्या तिस-या लाटेचा लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे असे म्हणता येईल.
दरम्यान कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रासह राज्य सरकारांनी लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेची पूर्ण तयारी करावी असे निर्देश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने दिले आहेत. यासंदर्भात आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. या काळात राष्ट्रीय आपत्कालिन परिवहन सेवेचे महत्व लक्षात घेऊन, त्याचे पुनर्गठन करावे, तसेच नवजात बालकं आणि लहान मुलांसाठी रुग्णवाहिकांसह इतर आरोग्यविषयक सेवांच्या सज्जतेसाठी तयारी करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत असे या पत्रात सूचवले आहे. नवजात बालकं आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचार व्यवस्थापनासंबंधी प्रोटोकॉल तयार केले असतील तर त्या संदर्भातील माहिती सादर करावी असे या पत्रात सूचवले आहे.
२०११ च्या जनगणनेच्या आधारे केलेल्या अंदाजानुसार भारतात ० ते ४ वयोगटातील मुलांची संख्या ११ कोटींपेक्षा जास्त आहे जी एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के आहे. १२ कोटींपेक्षा अधिक मुलं ५ ते ९ वयोगटातील, १० ते १४ वयोगटातील मुलं १२ कोटींपेक्षा जास्त आणि १५ ते १९ वयोगटातील मुले १० कोटींपेक्षा जास्त आहेत. एका आकडेवारी नुसार भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाची लोकसंख्या ४६.९ आहे. या आकडेवारीचा आधार घेतला तर भारतात तिस-या लाटेच्या प्रभावाखाली येणारी लोकसंख्या ३५-३८ टक्के असु शकते.
सर्व काही परत एकदा अनलॉक होत असताना परत एकदा लोकांकडून कोविड-१९ विषयक सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासुन आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास वेळ लागेल मात्र कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे म्हटले जात आहे. आपल्याला ही गोष्ट चांगली लक्षात ठेवली पाहिजे की, कोरोनाची तिसरी लाट येईल किंवा न येईल आपण मात्र या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली पाहिजे. कोरोनाच्या दुस-या लाटेच्या वेळी जो निष्काळजीपणा आपल्याकडून झाला त्याची किंमत संपूर्ण देशाने चुकवली आहे. अचानक आलेल्या दुस-या लाटेने यातुन सावरण्याची संधी सुद्धा दिली नाही.
कोरोनाच्या तिस-या लाटे संदर्भात सरकारचे दावे आणि तयारी आपल्या जागी आहे मात्र वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे. ग्रामीण भागात एकतर दवाखाने नाहीत, सोबत बालरोग तज्ञांची खूप वनवा आहे. हि कमतरता एका दिवसामध्ये तरी भरुन काढता येणार नाही. पूर्वीपासूनच ग्रामीण भाग शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेने पालक, डॉक्टर व सरकार यांची चिंता वाढवली आहे. मुल हि देशाच भवितव्य आहेत तरीसुद्धा याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने भारतात बालमजुरी, बालकांचे शारीरिक शोषण, कुपोषण, शाळाबाह्य मुले या समस्या कायम आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत ३० हजार बालकं अनाथ झाली आहेत. यापैकी काही बालकांना अनाधिकृतरीत्या दत्तक देवून एकप्रकारे विकल गेलय. शेवटी या महामारीच्या तिस-या लाटेचा संबंध देशाच्या भवितव्याशी ‘चिमुकल्यांशी’ असल्याने आपण कोविड-१९ नियमांचे उल्लंघन करत राहिलो तर देशाच हे भवितव्य धोक्यात येवू शकत हे आपण लक्षात घ्यायला हवं.
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई
संपर्क – ९४०३६५०७२२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular