Friday, March 29, 2024
Homeभंडारासहा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

सहा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

भंडारा :
कोरोना संचारबंदीच्या काळात निर्धारित वेळेनंतरही दुकान उघडे ठेवणाऱ्या सहा दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये असा ३० हजार रुपये दंड नगरपरिषदेच्या पथकाने दोन दिवसात ठोठावला. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.


भंडारा नगरपरिषदेच्या वतीने शहरात कोरोना संसर्ग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. रविवारी व सोमवारी भंडारा शहरातील विविध भागात सहा दुकाने निर्धारित वेळेनंतरही उघडी दिसली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मास्क न वापरणाऱ्या तीन दुकानदारांना प्रत्येकी १००० रुपये असा ३ हजारांचा दंड तसेच मास्क न घालणाऱ्या १२ ग्राहकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला तर शहरात विनामास्क फिरणाऱ्या १५ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. नगरपरिषदेच्या पथकाने दोन दिवसात ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, अधिकारी गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पथकाने ही मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघताना मास्कचा वापर करावा. कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही विविध कारणे सांगून नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने सांगितले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular