Friday, March 29, 2024
Homeभंडारारुग्णालयातील प्राणवायू नलिकांची तज्ञ समितीकडून तपासणी

रुग्णालयातील प्राणवायू नलिकांची तज्ञ समितीकडून तपासणी

भंडारा :
नाशिक येथील महानगरपालीकेच्या रुग्णालयात घडलेल्या प्राणवायू गळतीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील प्राणवायू नलिकांची तपासणी करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन साकोलीचे प्राचार्य डॉ. सी. एस. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.


भंडारा जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील प्राणवायू नलिकांची व प्रणालीची तपासणी करणे व उपाययोजना सुचविणे संदर्भात ही जिल्हास्तरीय समिती असणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांचे प्राचार्य हे या समितीचे सदस्य असतील तर जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्था भंडाराचे यु. आर. खाटोडे हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहे. प्राणवायू नलिकांची तपासणी करण्यासाठी औद्यागिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक मनुष्य बळाचे पॅनेल तयार करण्यात यावे असे आदेशात नमूद आहे. या पॅनलला तांत्रिक प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
तांत्रिक मनुष्यबळाच्या सहाय्याने जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील प्राणवायू नलिकांची तसेच संपूर्ण प्राणवायू प्रणालीची कालबध्द कार्यक्रम आखूण तपासणी, सदर तपासणीच्या वेळी नलिकांमध्ये गळती असल्यास अथवा पूणर्बांधणी करणे आवश्यक असल्यास या बाबतचा अहवाल सादर करणे. सदर अहवाल विचारात घेऊन जिल्हाधिकारी निर्णय घेतील. या समितीच्या कार्यकक्षा असणार आहे.
भंडारा जिल्ह्यात तीन शासकीय व 18 खाजगी रुग्णालयात प्राणवायू प्रणाली कार्यरत आहे. या सर्व रुग्णालयाची तपासणी समिती करणार आहे. यात सर्वाधिक ऑक्सिजन (O2) पॉईंट शासकीय रुग्णालय भंडारा येथे आहेत. आयसोलेशन बिल्डींग, मुख्य इमारत तिसरा मजला, पेईंग वार्ड, नेत्रचिकित्सा वार्ड असे मिळून 142 (O2) पॉईंट आहेत. या सोबतच साकोली रुग्णालय 20 व तुमसर रुग्णालयात 50 पॉईंट आहेत. या सर्व ठिकाणची तपासणी समिती करणार आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या खाजगी रुग्णालयातील प्राणवायू प्रणालीची तपासणीसुध्दा ही समिती तांत्रिक मनुष्यबळामार्फत करुन घेणार आहे. प्राणवायू गळती व प्राणवायू प्रणालीची तपासणी करण्यासाठी समिती अध्यक्षांनी कालबध्द कार्यक्रम तयार करावा अशा सुचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिल्या आहेत. तपासणीबाबत खाजगी रुग्णालयांना पूर्वसुचना देण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त होताच त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही समिती रुग्णालयातील प्राणवायू गळती व प्राणवायू प्रणालीची प्रत्यक्ष तपासणी करुन आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी संबंधितांना कार्यवाहीबाबत आदेशीत करतील.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular