Friday, March 29, 2024
Homeभंडारामान्सून पूर्व तयारीचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी संदीप कदम

मान्सून पूर्व तयारीचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा :
मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. मान्सून कालावधीतील संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पुर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंव्दारे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री कदम म्हणाले, मान्सून पुर्व कालावधीत सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात 154 नदीकाठावरील गावे आहेत. त्यापैकी 130 गावे पूर परिस्थितीने बाधित होतात व पूराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील एकूण 18 गावांचा संपर्क तुटतो या गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थतीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जागा शोधून ठेवाव्यात. उंच जागा, पर्यायी मार्ग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था व औषध साठा उपलब्ध ठेवावा. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी गावांना भेट देवून पाहणी करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. मान्सून कालावधीपुर्वी संबंधित विभागाने रस्ते, शाळा, समाज मंदिरे, सार्वजनिक इमारती यांची तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्याबाबतचा अहवाल सादर करावा. पावसाळ्यामध्ये साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात अशावेळी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार व्हावा यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे असे निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्यापुर्वी नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंयातीने आपल्या क्षेत्रातील नाले, नाली साफसफाईची कामे करावी. सोबतच पिण्याच्या पाण्याचे निर्जंतूकीकरण करावे. जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या संघटनांची बैठक घेवून ते वापरत असलेल्या बोट बचाव यंत्रणांसाठी वापराबाबत उपलब्ध होतील असे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. नॅशनल हायवेमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नाही. नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी साचलेल्या ठिकाणचे मार्ग मोकळे करण्यात यावे. गोसेखूर्द प्रकल्पाचे पाणी पातळीवर विशेष लक्ष देवून संजय सरोवर व बावनथडी प्रकल्प यांच्याशी संर्पकात राहण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
पोलीस विभागाने जिर्ण पुलावर बॅरीकेटींग करणे व वाहतुकीला आळा घाण्याबाबत, विद्युत विभागाने मान्सून पुर्व कामे करुन घेण्याबाबत, आरोग्य विभागाने औषध साठा उपलब्ध करुन देण्याबाबत, पुरवठा विभागाने पूर परिस्थितीत बाधित होणाऱ्या गावांकरीता आगाऊ धान्य वितरणाबाबत नियोजन करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंव्दारे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायतचे मुख्याधिकारी व विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular