Thursday, April 18, 2024
Homeभंडारानरव्हा रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक सुरूच !

नरव्हा रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक सुरूच !

महसूल व पोलिस विभागाचा रेती तस्करांना वरदहस्त

ओव्हर लोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण
लाखनी :- सुर्यास्तानंतर ते सूर्योदयापूर्वी नदी घाटातून रेती चा उपसा करून नये. असे शासनाचे दिशा निर्देश असले तरी रेती तस्करांकडून स्थानिक महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांशी अर्थकारण करून नियमास तिलांजली देत. रात्रभर रेती उपसा करण्यात येत असल्याचा प्रत्यय चूलबंद नदीतील नरव्हा रेती घाटावर आला आहे. या प्रकाराने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत असून रस्त्याची चाळण झाल्याने अवैध रेती वाहतुकीचा ग्रामस्थांना अकारण त्रास सहन करावा लागतो.


चूलबंद नदी खोऱ्यातील नरव्हा रेती घाट लाखनी तालुक्याचे शेवटचे टोक असून त्यानंतर लाखांदूर व साकोली तालुक्याची सीमा येते. हे गाव शेवटचे व दुर्गम असल्यामुळे अधिकाऱ्यांचे दौरे होत नाहीत. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांची चलती असते. नदी घाट खनिकर्म विभागाचे अखत्यारीत येत असल्यामुळे महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचे सनियंत्रण व देखरेखित येतात. पावसाळ्याचे दिवस असले तरी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे चूलबंद नदीचे पात्र कोरडेच आहे. तसेच या रेती घाटाचा लिलाव झाला नाही. पण पांढरी शुभ्र व उच्च प्रतीची रेती असल्यामुळे तालुक्यात बांधकाम क्षेत्रात प्रचंड प्रमाणात मागणी आहे.
नरव्हा रेती घाट तलाठी खराशी आणि मंडळ अधिकारी पालांदुर यांचे अधिकार क्षेत्रात येते. हे महसूल कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसतात. तसेच रेती तस्करांशी अर्थपूर्ण संबंधामुळे रात्री रेती उपसा व वाहतुकीची त्यांना खुली सूट आहे. असा गावकऱ्यांकडून आरोप होत आहे. नरव्हा रेती घाटातून पालांदूर व न्याहारवानी येथील रेती तस्करांकडून प्रचंड प्रमाणात रेती चे दोहन(उत्खनन) सुरू आहे. पण महसूल व पोलिस विभागाकडून वरची कमाई बंद होण्याचे भीतीपोटी कारवाई चे सौजन्य दाखविले जात नसल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान व नदि घाट परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागत असला तरी स्थानिक कर्मचाऱ्यांकडे मात्र उत्पन्नाचे स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती जमा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध रेती उपसा आणि वाहतूक बंद करून स्थानिक कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावी. अशी ग्रामीण जनतेकडून मागणी होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular