Friday, March 29, 2024
Homeभंडाराचोरीचा मामला, अन् महसुलही थांबला..!

चोरीचा मामला, अन् महसुलही थांबला..!

चुलबंद नदी पात्रातून मोठ्याप्रमाणात वाळू उपसा

महसूल व पोलिस विभागाची मिलीभगत
कालिदास खोब्रागडे लाखनी :- यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणच्या नदीपात्रात दर्जेदार वाळूचा संचय झाला आहे. या दर्जेदार वाळूवर वाळूतस्करांची वक्रदृष्टी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील अनेक शिवारातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. येथील वाळूची बेकायदा वाहतूक केली जाते. मात्र त्यावर प्रशासनातर्फे कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या वाळूउपसा होत आहे, ही अवैध वाळू विना क्रमांकाच्या मोठ्या वाहनांद्वारे वाहून नेली जात आहे. मात्र, या वाहतुकीला लगाम घालण्यात महसूल व पोलिस विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे वाळू तस्करांनी वाळूचा उपसा करण्यासाठी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
तालुक्यातील काही वाळू पट्टे लिलावाच्या प्रतीक्षेत असल्याने अनेक वाळू पट्ट्यांवर वाळू तस्करांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. अद्याप लिलाव झाले नाहीत तोच दुसरीकडे मऱ्हेगाव, पाथरी, नरव्हा, लोहारा, पळसगाव, भुगाव व चुलबंद नदी पात्रातील विविध नदी नाल्यातून वाळूचा अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. याकडे प्रशासन बघ्याच्या भूमिकेत पाहत आहे. त्यामुळे वाळूतस्करांची चांगले होत आहे.


यातून वाळू तस्कर गब्बर होत आहेत. प्रशासनातर्फे वाळूची चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे नदी पत्रातील दर्जेदार वाळू दिवसेंदिवस कमी होत आहे.
मागच्या काही महिन्यात निवडणूक कामात महसूल प्रशासन व्यस्त असल्याने वाळूतस्करांनी संधी साधली होती. वाळूतस्कर शासनाचा महसूल सुद्धा बुडवत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नदी ची पाणीपातळी घटताच वाळू चोरी(चौकट)
मऱ्हेगाव, पाथरी, नरव्हा, लोहारा, पळसगाव, भुगाव आदी गावातील नदी काठी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा आहे. खुद्द ग्रामपंचायत सदस्यच असलेले काही गावातील राजकीय मंडळीच रेती तस्करीचे “बादशाह” आहेत असे नागरीक सांगत आहेत. चुलबंद नदी ने पाणी पातळीतने तळ गाठला असून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू आहे.
वाळूला सोन्याचा भाव(चौकट)
कोरोनामुळे बांधकाम ठप्प पडले होते. अनलाॕक प्रक्रियेनंतर काही प्रमाणात बांधकाम सुरू झाले. मात्र, गरजूंना वाळू मिळत नाही. तस्कर चढ्या दराने वाळूची विक्री करतात. सध्या वाळूला सोन्याचा भाव आला आहे. दर वाढल्याने विविध योजनांचे घरकुल लाभार्थी हवालदिल झाले. सोन्याच्या दरातील वाळू खरेदी करणे अवघड झाले.
घर का भेदी…!(चौकट)
विना नंबर प्लेट असलेले ट्रॕक्टर व ट्रालीतून वाळू तस्करी जोमात सुरु आहे. एखाद दुचाकी किंवा चारचाकी वाहन विना नंबर प्लेटने रस्त्यावर धावत असेल तर पोलीसांची नजर चूकत नाही. मग नागरिकांना असा प्रश्न पडत आहे की, विना नंबर प्लेट ने वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर ट्रालीसकट खुले आम पोलीस स्टेशन समोरुन धावतात तेव्हा प्रशासन महाभारतातल्या धृतराष्ट्रासारखे आंधळ्याची भूमिका का घेतात? हा संशोधनाचा विषय आहे. या वाळू तस्करीला प्रशासननाचेच आशिर्वाद लाभले आहेत की काय?, अशी चर्चा दबक्या आवाजात नागरीक करत आहेत. वाळू तस्करांना प्रशासनाची इत्यंभूत माहिती देणारा तो प्रशासनातला माहितीगार कोण? असाही सवाल जनतेला पडला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular