Friday, March 29, 2024
Homeनागपुरकन्हान नदीत चौघा मित्रांना जलसमाधी

कन्हान नदीत चौघा मित्रांना जलसमाधी

पोहण्याचा मोह बेतला
एकाचा मृतदेह सापडला, तिघांचा शोध सुरू

खापा, वार्ताहर.
वाकी परिसरात सहलीला आलेल्या नागपूर येथील चार मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कन्हान नदीपात्रातील डेंजर डोहात मंगळवारी सकाळी घडली़ यातील एकाचा मृतदेह सापडला असून तिघांचा शोध सुरू आहे़
तोफीक आशिफ खान (16) रा़ शांती नगर, नागपूर, प्रविण गलोरकर (17) रा़ जयभिम चौक, यादव नगर, नागपूर, अवेश शेख नासीर शेख (17) रा़ वीएचबी कॉलनी, नागपूर व आरिफ अकबर पटेल (16) रा़ यादव नगर, जयभिम चौक, नागपूर अशी मृतकांची नावे असून अवेश शेख नासीर शेख यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे़.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी असलेले तेजू पोटपसे (20), थायान काजी (18), पलाश जोशी (20), विशाल चव्हाण (25) व मृतक असे एकूण आठ तरुण वाकी येथे सहलीला आले होते. मात्र, येथे पोहोचल्यानंतर त्यांना द्वारका वॉटर पार्क बंद दिसले. यामुळे त्यांनी परिसरात असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचे ठरवले. आठही जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले.नदीजवळ पोहोचताच आणि वाहते पाणी पाहून चौघांनी पोहायचे ठरवले. त्यानुसार आठ पैकी चार युवक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, या युवकांना पाण्याचा अंदाज लावता न आल्याने बुडू लागले. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.
बॉक्स…
पावसामुळे शोधकार्यात अडचण
पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. गोताखोरांना फक्त एका युवकाचा मृतदेह आढळून आला. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. परिसरात पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात मोठी अडचण येत आहे.
बॉक्स….
फलकाकडे होतेय दुर्लक्ष
वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोलगटडोह आहे. या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. याची माहिती देणारे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहे. मात्र, येथे येणाऱ्या युवकांना पोहण्याचा मोह आवरत नसल्याने फलकाकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्यात उतरतात. यामुळे अशा घटना सातत्याने घडत असतात.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular