Thursday, March 28, 2024
Homeनागपुरउमरेड नागरी: महाराष्ट्राची शान

उमरेड नागरी: महाराष्ट्राची शान

‘किल्ला’, ‘कापूस’, ‘कापड’ आणि ‘कोळसा’ या अलंकारांनी नटलेले ‘उमरेड’ शहर नागपूरपासून ४५ किमी अंतरावर नागपूरहून-गडचिरोली रस्ते मार्गावर व नागपूर-नागभीड या रेल्वे मार्गावर उमरेड हे शहर वसलेले आहे. हे शहर तिथल्या कोळसा खाणीसाठी आणि 'जय' या आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाघासाठी ओळखल्या जाणाऱ्या उमरेड-कऱ्हांडला या वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज नागपूरची आंतरराष्ट्रीय ओळख झालेला “सावजी” हा झणझणीत मसालेदार खाद्यप्रकार या भागातील स्थलांतरित 'हलबा' समाजाची एक खासियत आहे. १४२५ च्या आसपास गोंड राजा कर्णशहा याने उमरेड येथे किल्ला बांधला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतू ब्रिटिश गॅझेटिअरनुसार नागपूर शहराचा निर्माता गोंड राजा बख्त बुलंद शहा याने चिमूर येथील 'मुनाजी पंडित' यास चिमूर ते नागपूर मार्गावर “आम किवा आंभ” नदीला लागून असलेला जंगलाचा भाग १७०० ते १७१० च्या काळात दान दिला. मुनाजी यांनी तेथे रयते करवी जंगल साफ करून तो भाग वहिवाटीखाली आणला व तेथे वस्ती वसविली. त्यातूनच या खेडेवजा 'उमरेड' गावाची स्थापना झाली. पुढे १७७५ ला पहिल्या रघूजी भोसलेंचा मुलगा मुधोजी भोसले याने या गावातील तलावाला लागून मजबूत असा किल्ला बांधला. सुरुवातीला ३०० यार्ड लांब व ८० यार्ड रुंद भागात असलेल्या किल्ल्याला ५ फूट उंच व १२ फूट जाड विटांची तटबंदी व सहा भक्कम बुरुज होते, जे आता भग्नावस्थेत असून पूर्णतः दूर्लक्षित आहेत. टेव्हर्नियर या फ्रेंच प्रवाश्याने औरंगजेबाच्या कारकिर्दीत बुऱ्हाणपूर येथे एक समृद्ध विणकाम उद्योग्याची वसाहत असल्याचे वर्णन केले आहे. परंतू मुघल साम्राज्याच्या -हासानंतर तेथील विणकर देशोधडीला लागले. नागपूरच्या रघूजी भोसले राजाने त्यांना आपल्या राज्यात अभय दिले व विणकाम उद्योगाला चालना दिली. त्यामुळे नागपूर, उमरेड, भंडारा, चांदा (सध्याचे चंद्रपूर) अशी नवीन विणकाम उद्योगाची केंद्रे उदयाला आली. मराठा राजवटीमधेच उमरेड, पवनी या भागात 'कोष्टी' व 'हलबा' या विणकर लोकांची वस्ती प्रचंड वाढली आणि उमरेड हे मध्य भारतातील एक प्रमुख कापड व रेशीम उद्योग केंद्र झाले. पवनी, चिमूर, नागभीड, मुल, ब्रम्हपुरी, वैरागड या सर्व भागातील आयात आणि निर्यात नागपूर-उमरेड-नागभीड-मुल या मार्गाने होत असे. परंतु नंतर ब्रिटिशकाळात त्यांच्या आर्थिक साम्राज्यवादी धोरणांमुळे इथला हातमाग व्यवसाय डबघाईला आला आणि या भागातील विणकर समाज १८८० ते १९०० या काळात नागपूर, मुंबई, सोलापूर, सुरत येथे कापड मिल मध्ये गिरणी कामगार होऊन स्थलांतरित झाला. परिणामी उमरेड शहराचे वैभव लयाला गेले. १९०८ मध्ये उमरेड हे नागपूर- नागभीड या नॅरोगेज रेल्वे मार्गावर आले आणि ख-या अर्थाने जगाला जोडले गेले. त्या काळात उमरेडचे 'खान बहादूर बद्रुद्दीन मलक' नावाचे मालगुजार होते. त्यांनी नागपूरला मुस्लीम समाजाच्या शिक्षणासाठी अनेक शाळा, ग्रंथालये सुरु केली होती. आज नावाजलेल्या 'अंजुमन शिक्षण संस्थे'च्या स्थापनेमध्येसुद्धा त्यांचा फार मोठा वाटा होता. स्वातंत्र लढ्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी २५ मे १९३९ या दिवशी उमरेड तहसील कार्यालयावर किसान सभेने अहिंसक सत्याग्रह मोर्चा नेला होता. त्यावर पोलिसांनी हल्ला करून ११ शेतकऱ्यांना अटक केली; ज्यात ५ महिला व एका १२ वर्षाच्या कोवळ्या मुलाचा सुद्धा सहभाग होता. या सा-यांना नंतर सोडून दिले गेले. पण एका वृद्ध शेतकऱ्याचा मात्र मृत्यू झाला व उरलेल्या ४ सत्याग्रहींना पुढे शिक्षा झाली. या ‘किसान सत्याग्रहाची’ राष्ट्रीयस्तरावर खूप चर्चा झाली होती. १९६१ ला उमरेड परीसरात कोळश्याचा शोध लागला व ३८ दशलक्ष टन कोळश्याची क्षमता असल्याने या भागात कोळसा खाणी सुरु झाल्या. तो नागपूरला नेण्यासाठी नागपूर-बुटीबोरी हा फक्त मालवाहतुकीचा रेल्वे मार्ग १९६६ ला बांधला गेला. त्यामूळे उमरेड पुन्हा प्रकाशझोतात आले. अलौकिक निसर्गसौंदर्य आणि वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, नीलगाय, चितळ, सांबर यांसारख्या कैक वन्यप्राण्यांनी व पक्षांनी नटलेले उमरेड-क-हांडला हे अभयारण्य नागपूर पासून सर्वात जवळ असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. २०१६ मधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या भेटीने या अभयारण्याचे महत्व अधिकच अधोरेखित झाले. कित्येक दशकांच्या मागणी नंतर नागपूर-नागभीड हा नॅरोगेज मार्ग आता ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत होत असून यामूळे उमरेड व सभोवतालच्या भागातील लाखो विद्यार्थी, जनता आणि शेतकरी नागपूर शहराशी वेगाने जोडले जाऊन नजीकच्या काळात या भागाचा गतिमान विकास होईल यात शंका नाही.

मेरा उमरेड….मेरी शान

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular