Saturday, April 20, 2024
Homeचंद्रपुरचंद्रपूरचे पत्रकार भवन ज्ञानभवन, संदर्भभवन ठरावे – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरचे पत्रकार भवन ज्ञानभवन, संदर्भभवन ठरावे – आ. सुधीर मुनगंटीवार

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द पूर्ण केला – संजय तुमराम

चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाच्‍या नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्‍न

चंद्रपूर : राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्‍य टिळक असे परिवर्तन करणारे प्रत्‍येक थोर पुरूष पत्रकारच होते. पत्रकाराची शक्‍ती ही क्रांतीची शक्‍ती असते. नकारात्‍मकतेकडून सकारात्‍मकतेकडे जाताना पत्रकारितेला मिशन समजून कार्यरत पत्रकार बांधवांसाठी नविन इमारतीच्‍या बांधकामात मी योगदान देवू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. हे पत्रकार भवन ज्ञानभवन, संदर्भभवन ठरावे आणि या जिल्‍हयाच्‍या विकासात योगदान देणारे सर्वात मोठे शक्‍तीकेंद्र ठरावे अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

दिनांक 10 जानेवारी रोजी चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाच्‍या नवीन इमारतीच्‍या लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर महापौर राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार, उपमहापौर राहूल पावडे, चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांची उपस्थिती होती. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या काळात वैशिष्‍टयपूर्ण निधीतुन 2 कोटी रू. निधी खर्चुन सदर पत्रकार भवनाचे बांधकाम करण्‍यात आले. या पत्रकार भवनाचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, आज मुद्रण पत्रकारितेसमोर व्‍हॉट्सअॅप विद्यापीठाचे मोठे आव्‍हान आहे. जातीधर्मांमध्‍ये तेढ निर्माण करणे, कपोलकल्‍पीत बातम्‍या तयार करून समाजामध्‍ये विद्वेष निर्माण करण्‍याचे काम जोमाने सुरू आहे. या विरोधात लढा देत सत्‍याच्‍या बाजूने उभे राहण्‍याची जबाबदारी पत्रकार बांधवांवर आहे. आपली लेखणी प्रभावीपणे शोषणाच्‍या विरोधात वापरण्‍याची, पत्रकारितेला मिशन समजून समाजातील दुष्‍प्रवृत्‍तीचे निर्मुलन करण्‍यासाठी आपली लेखण वापरण्‍याची जबाबदारी पत्रकार बांधवांवर आहे. माजी मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार यांची आज जयंती आहे. कन्‍नमवारांनी संघर्षाच्‍या काळात घरोघरी वृत्‍तपत्र वितरीत केले व संघर्षसिध्‍दतेतुन मुख्‍यमंत्री होत महाराष्‍ट्राच्‍या विकासात मोठे योगदान दिले, अशा ज्‍येष्‍ठांचा आदर्श ठेवत मार्गक्रमण करण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी प्रतिपादीत केली.

श्रमीक पत्रकार संघाचे पदाधिकारी संजय तुमराम, प्रमोद काकडे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी पत्रकार भवनाची कल्‍पना माझ्यासमोर मांडली. मी सुध्‍दा त्‍वरीत होकार दिला. आज ही वास्‍तु लोकार्पित होत असताना मला मनापासून आनंद होत असल्‍याची भावना त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली. चंद्रपूर जिल्‍हयात पोंभुर्णा, मुल या ठिकाणी पत्रकार भवनाचे बांधकाम मी पूर्ण करू शकलो. राजुरा येथील पत्रकार भवनाच्‍या एका मजल्‍याचे बांधकाम पूर्ण करण्‍याच्‍या प्रक्रियेत योगदान देवू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. लोकशाहीचा चौथा स्‍तंभ म्‍हणून समाजाच्‍या एकूणच जडणघडणीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे सांगत चंद्रपूरच्‍या पत्रकार भवनाशेजारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेली पवित्र दीक्षाभूमी आहे व श्रध्‍देय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असलेला उड्डाण पुल आहे. अशा दोन महनीय व्‍यक्‍तींच्‍या प्रेरणादायी स्‍मृती या इमारतीच्‍या शेजारी आहे, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. भविष्‍यातही पत्रकार बांधवांच्‍या न्‍याय्य मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी लोकप्रतिनिधी म्‍हणून आपण कायम सोबत असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी यावेळी बोलताना दिली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्रमीक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संजय तुमराम यांनी केले. यावेळी बोलताना संजय तुमराम म्‍हणाले, आज पत्रकार बांधवांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले स्‍वप्‍न पूर्ण झाले. आ. मुनगंटीवार अर्थमंत्री असताना आम्‍ही त्‍यांच्‍याकडे मागणी केली, त्‍यांनी त्‍वरीत ती पूर्ण केली. या इमारतीच्‍या बांधकामासाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. दिलेला शब्‍द पूर्ण करणारा नेता म्‍हणून त्‍यांची ख्‍याती आहे. त्‍यांचा हा लौकीक पुन्‍हा एकदा सिध्‍द झाला असल्‍याची भावना संजय तुमराम यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार यांचीही भाषणे झालीत. या पत्रकार भवनाच्‍या उभारणीत महत्‍वपूर्ण योगदान देणा-या माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता उदय भोयर, कंत्राटदार सचिन डवले यांच्‍यासह अनेकांचा सन्‍मान यावेळी करण्‍यात आला. श्रमीक पत्रकार संघातर्फे लॉकडाऊनदरम्‍यान ऑनलाईन चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेतील विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषीके प्रदान करण्‍यात आले. कार्यक्रमाचे संचालन आशिष अम्‍बाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी केले. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाचे ज्‍येष्‍ठ सदस्‍य सुनिल देशपांडे, बाळ हुनगुंद, प्रमोद काकडे, महेंद्र ठेमस्‍कर, जितेंद्र मशारकर यांच्‍यासह संघाचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बांधव व नागरिकांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular