Tuesday, June 28, 2022
Homeवर्धासन 2021- 22 च्या 150 कोटीच्या प्रारूप आराखडयास जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

सन 2021- 22 च्या 150 कोटीच्या प्रारूप आराखडयास जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

यावर्षीचा एकही रुपया परत जाणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी
-पालकमंत्री सुनील केदार

वर्धा :- जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी सन 2021 - 22 या वर्षाच्या 150 कोटी 56 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास आज पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 110 कोटी 76 लक्ष , अनुसूचित जाती उपयोजना 26 कोटी 11 लक्ष, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 13 कोटी 69 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्याचा समावेश आहे. जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, अभिजित वंजारी, रणजित कांबळे, पंकज भोयर,समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, वित्त विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेम्भुरने उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये गाभा क्षेत्रात कृषी व संलग्न सेवा 12 कोटी 28 लक्ष पाटबंधारे व पूर नियंत्रण 16 कोटी 4 लक्ष, सामाजिक व सामूहिक सेवा 34 कोटी 51 लक्ष, ग्रामीण विकास कार्यक्रम 7 कोटी 30 लक्ष, बिगर गाभा क्षेत्रात ऊर्जा 10 कोटी 55 लक्ष, उद्योग व खाणकाम 41 लक्ष, परिवहन 8 कोटी, सामान्य आर्थिक सेवा 7 कोटी तर सामान्य सेवा 10 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अंमलबजावणी यंत्रणांकडून एकूण 153 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय बैठकीमध्ये अधिकची मागणी मांडण्यात येईल असे पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत पुनर्विनियोजन प्रस्तावावर बोलताना श्री केदार म्हणाले की, कोरोना काळात शासनाने लॉकडाऊनमुळे, तसेच निधीची कमतरता असल्यामुळे कामे थांबवली, मजुरांच्या अडचणीमुळे सुद्धा कामे थांबवावी लागली. परंतु आता शासनाने 100 टक्के निधी उपलब्ध करून दिला असून तो प्रत्येक विभागाला खर्च करायचा आहे. यातील एकही रुपया परत जाणार नाही याची काळजी अंमलबजावणी यंत्रणांनी घ्यावी, असे श्री केदार यांनी सांगितले. बांधकाम, जलसंधारण, महावितरण, वनविभाग, ग्रामविकास, क्रीडा व आरोग्य यांनी त्यांचा पूर्ण निधी खर्च होईल यासाठी प्रयत्न करावेत. बिरसा मुंडा कृषी स्वलांबन योजनेचा निधी पूर्णपणे खर्च करून आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास त्यांनी सांगितले. ग्रामीण क्षेत्रातील दलित वस्तीचा निधी नागरी भागात वळता करण्यावर श्री केदार यांनी आक्षेप नोंदवत हा निधी ग्रामीण भागातच खर्च करावा. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठका घेऊन ग्रामपंचायतीचे प्रस्ताव घ्यावेत असेही त्यांनी सांगितले. पांदण रस्ते योजनेत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी समीर कुणावार यांनी केली. याबाबत जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता बांधकाम यांनी प्रधान मंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि पालकमंत्री पांदण रस्ते योजनेत किती रस्ते करायचे आहेत आणि त्यासाठी किती निधी लागणार शिवाय ते पूर्ण होण्याचा कालावधी असा एकत्रित आराखडा तयार करावा. पुढील तीन वर्षांत जिल्ह्यातील सर्व रस्ते पूर्ण करू असे समितीचे अध्यक्ष श्री केदार यांनी सांगितले. पांदण रस्त्यावर केवळ मातीकाम होत असल्यामुळे ते पुन्हा खराब होतात त्यामुळे प्रायोगिक स्तरावर त्यावर चुना आणि रेतीचे उपचार करून त्याची क्षमता वृद्धी करण्यासाठी कोणत्याही दोन गावातील दोन पांदण रस्ते तयार करावेत. त्यासाठी येणारा खर्च आणि टिकाऊ क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढील पांदण रस्ते अशा पद्धतीने करता येतील का याची चाचपणी करावी, असा प्रस्ताव आमदार रणजित कांबळे यांनी यावेळी मांडला. याबाबत दोन रस्ते प्रायोगिक स्तरावर करण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. प्रत्येक गावात स्मशानभूमीसाठी रस्ता आणि शेड याला प्राधान्याने निधी द्यावा, धडक सिंचन विहीर योजनेतील निधी लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होईल यासाठी पाठपुरावा सुरू आहे, तसेच बसस्थानकाला लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे निवास स्थान आणि सरपंच भवन उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा तसेच पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असेही पालकमंत्री यांनी याप्रसंगी सांगितले. आमदार वंजारी यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे डी सी पी एस मधील जमा न झालेल्या रक्कमेचा मुद्दा मांडला यावर पुढच्या बैठकीत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेत. तसेच शाहिद आष्टी येथे शाहिद स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आमदार आंबटकर यांच्या मागणीचा विचार अवश्य करू असेही पालकमंत्री तथा नियोजन समितीचे अध्यक्ष सुनील केदार यांनी यावेळी सांगितले. बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी तसेच सर्व अंमलबजावणी यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.


25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन वर्धा : 25 जानेवारी हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हयात राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साधे पणाने साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे यांनी केले आहे. मतदार दिनानिमित्त जिल्हयातील सर्व मतदान केंद्र, ग्राम पंचायत व शाळा आणि महाविद्यालयामध्ये दुपारी 12 ते 2 या कालावधित फेसबुक लाईव्ह व्दारे प्रसारण करुन 18 वर्ष पूर्ण केले नविन तरुण मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय येथून लाईव्ह फेसबुक व्दारे प्रसार करण्यात येणार आहे. तसेच कलापथकाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे.मतदार जनजागृतीच्या लाईव्ह फेसबुक कार्यक्रमाला संबधित मतदान केंद्र, ग्राम पंचायत व शाळांमध्ये उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे उपनिवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular