Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाशेतक-यांनी दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढवावे

शेतक-यांनी दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढवावे

-पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

भिडी येथे महिला बचत गटांना औजारे बँक योजनेचा लाभ

वर्धा :- हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. यासाठी राज्य शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा सीमांत शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारा आहे. शेतकऱ्यांनी मिळालेल्या योजनेचा लाभ घेऊन दुबार पीक घेण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले.

देवळी तालुक्यातील भिडी या गावात 11 महिला बचत गटांना अवजारे बँके योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री केदार बोलत होते.यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, कृषीचे सहसंचालक रवींद्र भोसले, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ विद्या मानकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन सर्वस्तरावर प्रयत्न करीत आहे. विकेल ते पिकेल अभियानांतर्गत सावता माळी बाजाराचा शुभारंभ सुद्धा केला आहे. आता शेतकऱ्यांनी सुद्धा वर्षातून दोन ते तीन पिकांचे नियोजन करावे आणि उत्पन्न वाढवावे असे श्री केदार म्हणाले. यावेळी आमदार रणजित कांबळे यांनी सुद्धा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची माहिती दिली. कृषी अवजारे मिळालेल्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग करावाच पण त्याची योग्य काळजी घ्यावी असेही सांगितले.

यावेळी अवजारे बँकेचा लाभ घेणाऱ्या महिला बचत गटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यामध्ये अहिल्याबाई महिला स्वयंसहाय्यता बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, भवानी माता महिला बचत गट, सत्यसाई महिला बचत गट, समृद्धी महिला बचत गट, राणी लक्ष्मीबाई महिला स्वयंसहायता बचत गट, प्रेरणा महिला बचत गट, राजमाता जिजाऊ महिला बचत गट, जय मातादी महिला बचत गट, मेहरबाबा महिला बचत गट, सहारा महिला बचत गट या अकरा महिला बचत गटांचा समावेश आहे.तसेच यावेळी दुरगडा या गावातील वीज पडून मृत्यू पावलेल्या नितेश मुन यांच्या कुटुंबास 4 लक्ष रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. त्याचा धनादेश सुद्धा मृताच्या कुटुंबास देण्यात आला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular