Monday, June 27, 2022
Homeवर्धामहाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा

महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा

पालकमंत्री सुनील केदार यांनी केले मुख्य ध्वजारोहण

वर्धा :-कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी साधेपणाने आणि कोरोनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी ध्वजारोहण केले. तसेच पोलीस विभागाची मानवंदना स्विकारली.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, आदी मान्यवर उपस्थित होते.

————-/—-///////—

वर्ध्याच्या जम्बो कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे

-पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

· पूर्ण व्यवस्था असल्याशिवाय नवीन सेंटर उभारू नये

· जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणास उद्यापासून प्रारंभ

· इतर जिल्ह्याच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी चांगली

· इतर जिल्ह्यातील रुग्णांनाही आरोग्य सेवा देतोय ही जमेची बाजू

वर्धा : उत्तम गलवा येथील ऑक्सिजन वापरून जम्बो कोविड केंद्र तयार करण्याची कारवाई झपाट्याने सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या ते पूर्ण असावे यासाठी जेवढा कालावधी अपेक्षित आहे तेवढा द्यावा लागेल. आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रस्तावास मान्यता दिली असून प्रस्ताव कॅबिनेट पुढे आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण अगदी साधेपणाने करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागच्या वर्षी पहिल्या लाटेत उत्तम व्यवस्थापन करणारा जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याला ख्याती मिळाली. पण कोविडची दुसरी लाट तीव्र व हानिकारक आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, परिचारिका अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या जिल्ह्यातील दोन मोठ्या आरोग्य संस्थानी इतर जिल्ह्यातील रुग्णांना सुद्धा या काळात संजीवनी दिली आहे. चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातील रुग्ण आल्या जिल्ह्यात भरती होतात व उपचार घेऊन बरे होऊन घरी जातात, इतर जिल्ह्यांना मदत करणे ही आपल्या जिल्ह्याची जमेची बाजू आहे. जम्बो कोविड सेंटर साठी तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कालावधी लागेल, अशा काळात तांत्रिक तज्ञ पण लवकर उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे सर्व बाबी पूर्ण झाल्यावरच हे सेंटर सुरू होईल असे म्हणाले.

तालुक्याच्या ठिकाणी बेड वाढवण्याची मागणी होत आहे. सामान्य माणसाला आरोग्य सुविधा पुरविणे ही प्राथमिकता आहेच. पण ऑक्सिजन संबंधी अडचण आहे. महाराष्ट्रात रायपूर, ओरिसा आणि इतर राज्यातुन प्राणवायू येत आहे. पण आता त्याठिकाणी सुद्धा कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आपल्या राज्यात प्राणवायूचा पुरवठा कमीच होत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन उपलब्धता पाहून बेड वाढवण्याचा निर्णय घेऊ. तसेच पूर्ण सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय नवीन सेंटर उभे करणार नाही असेही पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

गंभीर रुग्णांची भटकंती थांबली

मध्यंतरी रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते, मात्र जिल्हाधिकारी यांनी लावलेल्या व्यवस्थेमुळे रुग्ण हाताळणी व्यवस्थित झाली आहे. आता गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत आहेत. तसेच बेडसाठी आता रुग्ण भटकताना दिसत नाहीत ही आशादायक परिस्थिती आहे.

उद्यापासून (2 मे)18 ते 44 वयोगटातील लसीकरणास प्रारंभ

राज्यशासनाने खरेदी केलेल्या 5 हजार लसीचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. त्यातून उद्यापासून जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल. जिल्ह्यात वर्धा येथे गांधी लेप्रसी फाउंडेशन , ग्रामीण रुग्णालय पुलगाव, ग्रामीण रुग्णालय कारंजा, टाका ग्राउंड उप प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणघाट आणि उपजिल्हा रुग्णालय आर्वी असे 5 केंद्र सुरू करण्यात आले आहेत. उद्या दुपारी दोन नंतर लसीकरण सुरू होईल.

जिल्ह्यात लसीकरण उत्तम

जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरणासाठी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे जिल्ह्यात 45 वर्षापुढील नागरिकांचे 40 टक्के लसीकरण झाले आहे.आपल्या जिल्ह्याला कोव्हक्सीन 27 हजार 940 मिळाल्या असून कोविशील्ड – 2लाख 2 हजार 620 प्राप्त झाल्या आहेत. या लसीचा जिल्ह्याने पूर्णपणे उपयोग केला आहे. कोरोनावर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाबात भीती आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांनी जनजागृती करावी, असे आवाहन श्री केदार यांनी याप्रसंगी केले.

लस पुरवठ्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. लसीचा पूर्ण पैसा राज्यशासन एका चेकवर द्यायला तयार आहे. पण लसी मिळायला हव्यात. राज्याच्या सगळ्या पक्षांच्या लोकांनी तगादा लावल्यास महाराष्ट्राला लसी मिळण्यास अडचण जाणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

——–////////——

वैद्यकीय व वैद्यकीय पेशाशी इतर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सेवा कोविड काळात घेण्यासाठी पाठपुरावा करणार

-पशुसंवर्धनव दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

वर्धा :- कोरोना काळात रुग्णांच्या वाढत्या संख्येला डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्सेस यांची कमतरता जाणवत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष, नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी तसेच पॅथॉलॉजीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची सेवा घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यासाठी असे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री केदार यांनी सांगितले.

धवाजारोहण कार्यक्रमानंतर श्री केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. सेवाग्रामच्या कस्तुरबा कोविड समर्पित रुग्णालयाला 400 बेडसाठी अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त 20 के एल द्रव ऑक्सिजन टँकरद्वारे पुरवण्यासाठी भिलाई येथील प्रॅक्स एअर लिंडे येथून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त मागणी कळवावी, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्यात. आतापर्यंत सेवाग्रामसाठी त्यांनी दोन ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक कामासाठी वापरले जाणारे ऑक्सिजन सिलेंडर सद्यस्थितीत रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सर्व एम आय डी सी मधील उद्योगांना आदेश द्यावेत असे श्री केदार यांनी यावेळी सांगितले.

सेवाग्राम रुग्णालयात सध्या 300 बेड आहेत आणखी 100 बेड सुरू करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याची तयारी करण्यात येत आहे. 400 बेड पैकी 350 ऑक्सिजन बेड आणि अति दक्षता विभागात 50 बेड होतील. त्यासाठी 20 के एल ची टॅंक आहे. तसेच 800 सिलेंडर आहेत, जे बॅक अपसाठी वापरले जातात. 20 के एल ची टाकी एक दिवसानंतर भरली जाते. त्यामुळे सदर टाकीसाठी एक दिवस आड ऑक्सिजन पुरवठा झाला तर ऑक्सिजनचा प्रश्न मिटेल अशी मागणी सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ गंगणे यांनी केली. समर्पित कोविड हॉस्पिटल म्हणून दर्जा आहे, त्याप्रमाणात साधन सामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार सागर मेघे यांनी केली.

या बैठकीला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बड़े, सावंगी रुग्णालयचे सागर मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नितीन गंगणे, डॉ अभ्युदय मेघे, पालकमंत्री यांचे ओ एस डी डॉ. इंगोले, तसेच इतर अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular