जिल्ह्यातील सहा प्रकल्पात शंभर टक्के जलसंचयन
निम्नवर्धाचे 31, बेंबळाचे चौदा तर बोरचे सात दरवाजे उघडले

वर्धा : गेल्या चोविस तासापासून सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे जिल्ह्यातील 11 प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. प्रकल्पांच्या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस सुरु असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातील पाण्याची पातळी 283.57 मीटर वाढली असून 93.25 टक्के धरण भरले आहे. या प्रकल्पाचे 31 दरवाजे प्रत्येकी 45 सेमीने उघडण्यात आले असून 1307 क्यूमेक्स जल विसर्ग होत आहे. बोर प्रकल्पात 92 टक्के जलसंचय झाला असून प्रकल्पाचे सात दरवाजे प्रत्येकी 20 सेमीने उघडण्यात आले आहे. त्यातून 111.22 क्यूमेक्स जल विसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
बेंबळा प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस सुरु असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बेंबळा प्रकल्पातून 900 क्यूमेक्स ने येवा चालू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या जलाशयात सतत वाढ होत असून धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने बेंबळा प्रकल्पाचे चौदा दरवाजे प्रत्येकी 50 से.मी.ने उघडण्यात आले आहे. बेंबळा धरणातून 742 घनमीटर प्रती सेकंद एवढा विसर्ग होत आहे.
वर्धा जिल्ह्यातील व जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील मोठे, मध्यम जलाशयांची पाणी पातळी व पाणी साठ्या संदर्भातील तपशील असा आहे-
जिल्ह्यातील धाम, पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन व मदन उन्नई ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तसेच बोर प्रकल्प 92 टक्के, लाल नाला 91.75 टक्के, वर्धा कार नदी 86.93 टक्के भरले असून तेवढा जलसाठा आहे. नांद प्रकल्प 80 भरला असून प्रकल्पाचे 2 दरवाजे प्रत्येकी 10 सेंमीमीटरने उघडले. वडगाव 89 टक्के व उर्ध्व वर्धा प्रकल्प 92 टक्के भरलेला आहे.
जिल्ह्यातील एकूण 20 लघु जलाशयात 71 टक्के जलसाठा निर्माण झाला असून धरणाची दारे बंद आहेत.