मंत्रालयातून मिळाला स्थगणादेश,
विरोधकांचे दणाणले धाबे.
सेलु :- तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथील थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष संगीता शेंडे यांना शुल्लक कारणावरून जिल्हाधिकारी, वर्धा यांनी पायउतार केले होते. त्या निर्णयाच्या विरोधात शेंडे यांनी मंत्रालयात धाव घेतली होती.

अखेर त्यांना नगरविकास मंत्रालयातून जिल्हाधिकारी, वर्धा यांच्या आदेश विरोधात स्थगणादेश देण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष संगीता शेंडे यांनी नगर परिषदेत कार्यभार सांभाळल्या नंतर दिली.
माहिती देताना संगीता शेंडे म्हणाल्या की, जिल्हाधिकारी, वर्धा याच्याकडे आलेल्या चंद्रशेखर बेलखोडे यांच्या तक्रारी वरून महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम ४४ (४) अन्वये नगराध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केले होते. त्या विरोधात नगरविकास मंत्रालयात याचिका दाखल केली होती. पाच जानेवारी रोजी नगरविकास मंत्रालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांच्या सहीने जिल्हाधिकारी, वर्धा यांना तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निर्णयाची प्रत पाठविण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या .
आश्चर्याची बाब म्हणजे नगराध्यक्ष पदावरून शेंडे यांना अपात्र घोषित करताच भाजपच्या व काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी जल्लोष साजरा केला होता. आज नगराध्यक्ष पदी पुन्हा आरूढ झालेल्या संगीता शेंडे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. सत्काराला उत्तर देतांना शेंडे म्हणाल्या,काल पर्यंत माझ्याशी एकनिष्ठ असणाऱ्या उपाध्यक्ष वंदना डकरे व इतर दोन नगरसेवकांनी ऐनवेळी दगा दिला. उपाध्यक्ष वंदना डकरे यांना मा. नगर परिषद १९६५ चे अन्वये अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळण्याची कायद्यात तरतूद आहे. परंतु, अध्यक्षाच्या खर्चीसाठी हपापलेल्या वंदना ताईने क्षणाचाही विलंब न करता सर्व नियमांना तिलांजली देत अध्यक्ष पद बळकावले. आता त्यांचे अध्यक्षपद संपले आहे. व पुन्हा पदावनत होऊन उपाध्यक्ष व्हावे लागणार आहे. या रणधुमाळीत अनेकांचे चेहरे पाहण्याजोगे होते.