Sunday, May 29, 2022
Homeवर्धातिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सज्ज राहावे - जिल्हाधिकारी

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी

Ø संसाधनांच्या व्यवस्थेसह तयारीचा घेतला आढावा वर्धा :- जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्राणवायूची उपलब्धता, व्हेंटिलेटर्स, प्राणवायू असलेल्या खाटा, लहान मुलांसाठी वार्ड, महिला रुग्णालयाचे काम, औषधांचा साठा, इत्यादी बाबींचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आढावा घेतला असून या सर्व आघाडीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील रुग्ण आढळले असून आपल्या जिल्ह्यातही या जनुकीय परिवर्तन झालेल्या विषाणूचा प्रवेश होऊ शकतो. यासाठी प्रशासनाची आणि आरोग्य विभागाची तयारी तसेच जिल्ह्यात मधल्या काळात निर्माण केलेल्या संसाधनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, डॉ नितीन निमोदिया, डॉ महाजन, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रकाश बुब इत्यादी उपस्थित होते. दुसऱ्या लाटेत प्राणवायू अभावी लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे ऑक्सिजनच्या पुर्ततेवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 खाटांचा अतिदक्षता कक्ष कार्यान्वित करण्यासही त्यांनी सांगितले. सोबतच 35 व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही दिलेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला 10 लिटरचे 5 कॉन्सट्रेटर देण्यात यावे. तसेच सामाजिक दायित्व निधीतून जम्बो सिलेंडर खरेदी करावेत. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात जम्बो सिलेंडरचा साठा करुन ठेवावा, ऐनवेळी अनुचित घटना घडल्यास हा साठा वापरून प्राणवायू पुरवठा करणे शक्य होईल असेही श्रीमती देशभ्रतार यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांसाठी वेगळा वार्ड तयार करावा. त्याठिकाणी मुलांना औषधोपचारा सोबतच त्यांना रुग्णालयातील गंभीर वातावरणातून विरंगुळा निर्माण करण्यासाठी खेळणी, विविध खेळ ठेवावेत. तसेच वार्डची रचना मुलांच्या अनुषंगाने आनंददायी करावी. या वार्डसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची मागणी नोंदवावी. तसेच लहान मुलांच्या औषधांचा प्रोटोकॉल तयार करावा. प्राणवायू वहिनीच्या कामासोबतच महिला रुग्णालयाचे काम एक महिन्यात पूर्ण करावे. येथील दोन्ही माळ्यावर प्रत्येकी 100 खाटांची व्यवस्था करावी. याशिवाय कोरोना उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवण्यासाठी खरेदी प्रक्रिया राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. जिल्ह्यातील सर्व शासकीय डाक्टर, परिचारिका यांचे आय सी यु हाताळणी बाबतचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्यात.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular