Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाजिल्हयातील 32 अपघात प्रवण स्थळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे,

जिल्हयातील 32 अपघात प्रवण स्थळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे,

संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

      वर्धा : जिल्हयातील एकुण 32 अपघात प्रवण स्थळांमुळे (Black Spot) प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. तसेच या स्थळावर वारंवार लहान मोठे अपघात घडत असतात. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या अपघात प्रवण स्थळांच्या (Black Spot) दुरुस्तीचे प्रस्ताव संबधीत विभागांनी तातडीने सादर करुन आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश खासदार रामदास तडस यांनी संसद सदस्य रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित अधिकारी वर्गाला दिले.

  केन्द्रशासनाच्या सुचनेनुसार दिनांक 18 जानेवारी 2021 पासून पुढील 30 दिवस रस्ते सुरक्षा महिना वर्धा व अमरावती जिल्हयात चांगल्या प्रकारे आयोजीत करावा व त्या माध्यमातुन रस्ते सुरक्षा संबधीत जनजागृती करण्याकरिता प्रशासनाने व समितीच्या वतीने सकारात्मक प्रयत्न करावे, असे आवाहन देखील यावेळी श्री. तडस यांनी केले. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रातील निगडीत रामा क्रमांक 361 वरील रस्ते सुधारणा, राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलीस ठाणे अथवा चैकी निर्माण करणे, वर्धा जिल्हयात रस्ते सुरक्षा समितीच्या पुढाकारातुन ट्रॅफीक पार्कची निर्मीती करणे, अपघाताची आकडेवारी करण्याकरिता प्रत्यक्ष आवश्यक उपाययोजना करणे, सिंदी (रेल्वे), आर्वी शहर व वरुड शहर जिल्हा अमरावती येथे नविन बाहय वळण रस्त्याची निर्मीती इत्यादी अनेक विषयावर बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 जिल्हयातील अपघात कमी होण्याकरिता तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती तातडीने होण्याकरिता उपस्थित अधिकारी वर्गांनी या संबधीत चे प्राकलन तयार करुन मंजुरी करिता सादर करावी, तसेच पुढील सभेमध्ये  या विषयीचा सविस्तर आढावा घेतला जाईल. तसेच ट्रॅफिक पार्क निर्मीतीकरिता जागेची पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. विवेक भिमनवार यांनी संबधीतांना दिल्या.

  आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली  यावेळी बैठकीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपप्रादेशिक पहिवहन अधिकारी विजय तिरणकर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता श्री. कुंभे, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वर्धा चे उपअभियंता श्रीमती गुर्वे, महामार्ग पोलीस विभागाचे उपअधिक्षक श्री. पांडे तथा समितीचे अशासकीय सदस्य किरण उरकांदे, प्रणव जोशी, शिरीष भांगे तसेच इतर शासकीय सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular