शोएब शेख
देवळी:- दोन दिवसापूर्वी यशोदा नदीपलीकडे यवतमाळ महामार्गाच्या दुभाजकावर कार आदळून दोघेजण ठार झाले. मात्र हा अपघात एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचे संतुलन बिघडल्याने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही दुचाकी यशोदा नदीच्या पलिकडील अंदोरी टी पॉइंट वरून चुकीच्या पद्धतीने दुभाजक ओलांडून महामार्गावर आली. त्यामुळे यवतमाळ मार्गे देवळीकडे भरधाव जाणारी कार महामार्गाच्या दुभाजकावर आढळून भीषण अपघात झाला. यापूर्वीसुद्धा महामार्ग प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या टी पाइंट वर अनेक अपघात झाले असून, हे स्थळ कर्दनकाळ ठरत आहे. याला महामार्ग प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
अंदोरी टी पाइंटच्या पलीकडे अनेक गावे असल्याने तसेच त्यांचा देवळी शहराशी दररोजचा संपर्क राहिला आहे. त्यामुळे महामार्ग बांधतांना या टी पाइंट जवळ बोगदा देऊन ही वाहतूक देवळी शहराकडे करणे आवश्यक होती. यापूर्वीच्या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टी पॉईंट जवळ चक्काजाम आंदोलन करून हा मार्ग रोखून धरला होता. यावेळी महामार्ग प्रशासनाने गतिरोधक सह अनेक सुविधा देण्यासोबत टी पाइंटची वाहतूक इसापूर कडे काही दूर पर्यंत नेऊन त्यानंतर देवळीकडे वळती करणार असल्याचे सांगितले होते. मात्र महामार्ग प्रशासनाची आतापर्यंतची कृती केवळ वेळ मारून नेण्याची राहिली आहे. दोन दिवसापूर्वी चा अपघात यास टी पॉइंट मुळे झाला असल्याचे सांगितले जात आहे. शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात अंजती कडून आलेली दुचाकी अचानक दुभाजक ओलांडून महामार्गावर आली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात संबंधित कार अपघात ग्रस्त होऊन यामध्ये दोन जणांचा नाहक बळी गेला. तरी देखील महामार्ग प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. अपघात रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची गरज आहे.