जिल्ह्यात नव्याने चार ठिकाणी लसीकरण केंद्र
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीला जिल्ह्यातील पाच ठिकाणी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता.

आजपासून आणखी चार ठिकाणी लसीकरण मोहीम सुरु झाली असून जिल्ह्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे एकूण नऊ केद्र झाले आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहरात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर डॉक्टरांनी कोरोनाची लस घेतली.
आजपासून सुरु झालेल्या केंद्रामध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय, यवतमाळ शहरातील पाटीपूरा येथील नागरी आरोग्य केंद्र तसेच यवतमाळ शहरातील क्रिटीकेअर हॉस्पीटलचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी नागरी आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेवून नवीन केंद्राच्या लसीकरणाची सुरुवात केली. त्यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर आणि डॉ. भारती, डॉ. चव्हाण, डॉ. दीपक अग्रवाल यांनी सुध्दा लस घेतली.
यावेळी डॉ. दिलीप देशमुख, डॉ. सचिन बेले यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते. राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आ. डॉ. अशोक ऊईके यांच्याहस्ते लसीकरणाचे उद्घाटन झाले. या मोहीमेकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदींचे सहकार्य लाभले. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी विविध टप्प्याक्रमाने नागरिकांनी सामोर यावे. तसेच दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.