युवक काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा
घाटंजी : तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो.

तालुक्यात मजूर, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून या वर्गाला आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. मात्र शहरातील भारतीय स्टेट बँक शाखा गेल्या १५ दिवसापासून बंद असल्याने जनतेला आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अल्पवधित बँक सुरू न झाल्यास रस्ता-रोखो आंदोलन करण्याचा इशारा घाटंजी युवक काँग्रेसकडून देण्यात आला.
गेल्या १५ दिवसापासून भारतीय स्टेट बँक घाटंजी शाखेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बँक बंद असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यातील मजूर, शेतकरी, कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणात भारतीय स्टेट बँकचे ग्राहक असून बँक बंद असल्याने व्यवहार करण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.शहरात महाराष्ट्र बॅक व भारतीय स्टेट बँक अशा दोन
बॅंकाचे ATM आहे. त्यामध्येसुद्धा पैसे राहत नसल्यामुळे खाजगी बॅंकेचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे खाजगी बँकेत पैसे काढण्यासाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहे. यामुळे हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा नागरीकांच्या वाढत्या व्यवहाराला लक्षात घेऊन बॅंकेने आणखी दोन एटीएम उपलब्ध करून सामान्य नागरिकांची होणाऱी गैरसोय थांबवावी. याकरिता घाटंजी युवक काँग्रेसकडून तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. बॅंकेची शाखा पाच दिवसाच्या आत सुरू न झाल्यास भारतीय स्टेट बँके समोरील मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.