यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पद भरतीचा निकाल तत्काळ जाहीर करा आणि ४२ पदे आरक्षणानुसार भरावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हा बँकेच्या येथील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले होते.

या उपोषणाची दखल घेत बँकेच्या संचालक मंडळाने उपोषण मंडपात जाऊन प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याशी चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे अभिवचन दिले. त्यामुळे प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी उपोषण मागे घेतले.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील कार्यालयापुढे १९ जानेवारीपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बिपिन चौधरी यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, संजय देरकर, बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, संचालक राजूदास जाधव, संजय मोघे आदींनी उपोषण मंडपात भेट दिली. त्यानंतर प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.यावेळी संचालक मंडळाने त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे अभिवचन प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकत्यांना दिले. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण सोडविले.