Monday, June 27, 2022
Homeमहाराष्ट्रकोरोनामुळे रत्नाळ पिकवणारा शेतकरी आर्थिक संकटात

कोरोनामुळे रत्नाळ पिकवणारा शेतकरी आर्थिक संकटात

लाडखेड-

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात येत असलेल्या लाडखेडची ओळख अख्ख्या विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रात रत्नाळाचे माहेरघर अशीच आहे. महाशिवरात्रीला महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील शिवभक्तांचा उपवास अनेक पिढ्यांपासून लाडखेडची रत्नाळीच गोड करतात. कोरोनाच्या सावटामुळे व्यापाऱ्यांनी रत्नाळांची खरेदीच न केल्याने शिवभक्तांना लाडखेडच्या रत्नाळांपासून वंचित रहावे लागणार आहे. तर रत्नाळे पिकवणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.


माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस शिवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो.

तसेच उपवासांचे विविध व्यंजन चाखायला मिळणार असल्याने अनेक खवय्यांचाही हा आवडता दिवस असतो. वर्षभर कधीही न मिळणारी रत्नाळी या दिवसात मुबलक उपलब्ध असल्याने उपवासाच्या व्यंजनात हीला मानाचे स्थान असते.


मात्र ही रत्नाळी पिकविण्यासाठी परिश्रमही खूप घ्यावे लागतात. आणि हे परिश्रम लाडखेडमधील 250 ते 300 शेतकरी दरवर्षी घेत असतात. महाशिवरात्रीच्या चार ते पाच महिन्यापुर्वीपासूनच रत्नाळाची शेती केली जाते. रत्नाळी पक्व होताच महाराष्ट्रासह परप्रांतातून व्यापारी मोठ्या प्रमाणे लाडखेड येथे दाखल होतात. या खरेदीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दोन ते तीन एकर शेती असलेला अल्पभूधारकही चार लाखांहून अधिक कमाई करतो. यावर्षी कोरोना व टाळेबंदीमुळे रत्नाळे खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी लाडखेडकडे पाठ फिरवली आहे. याचा लाडखेडमधील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. रत्नाळी उत्पादक अर्थिक अडचणीत सापडला असून त्यांचे वार्षिक नियोजनच बिघडले आहे.
त्यामुळे येथील प्रगतिशील युवा शेतकरी चेतन दुधे,अंकुश चिरडे ,सुरज इंगोले, गौरव दुधे यांनी या टाळेबंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular