भंडारा :
केंद्र शासनाचे किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग आजार दूरीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन स्तरावर दरवर्षी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येते. ज्यात वर्षातून एक विशिष्ट कालावधीत सदर मोहीम राबविण्यात येते. ज्यामध्ये सर्व नागरिकांना एकाच दिवशी हत्तीरोग दूरीकरणाच्या दृष्टीने डी.ई.सी. व अलबेंडाझोलच्या गोळ्या खाऊ घातल्या जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 1 जुलै ते 15 जुलै 2021 या कालावधीत जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये भंडारा जिल्ह्याच्या एकूण 12 लाख 68 हजार 153 लोकसंख्येपैकी गरोदर माता, अती गंभीर आजारी रुग्ण व दोन वर्षाखालील बालके वगळता 11 लाख 79 हजार 386 लोकसंख्या निवडण्यात आलेली आहे.

ही मोहीम 1 जुलैपासून सुरु होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सदर गोळया ह्या वयोगटानुसार वाटप करण्यात येतात तसेच सदर गोळ्या जेवनानंतरच खायच्या असतात.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन हे कर्मचाऱ्यांच्या समक्षच खाण्यात यावे, जेणेकरुन शासनाने ठरविल्याप्रमाणे 100 टक्के लोकांनी गोळ्यांचे सेवन केल्याची खात्री होईल. सदर गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. हत्तीरोग आजाराचे दूरीकरण या शासनाच्या मोहिमेमध्ये जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.
28 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.आदिती त्याडी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य विभागातर्फे 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे असे त्यांनी सांगितले.
सदर डी.ई.सी. गोळीपासून कोणताही दुष्परिणाम जाणवत नाही. करीता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे व आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला 100 टक्के यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी केले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.आदिती त्याडी म्हणाल्या की, एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही. परंतू हत्तीरोग होवू नये म्हणून डी.ई.सी. गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा ‘हत्तीरोग’ दिनी अशी सलग 5 वर्षे खाल्ल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबते व पर्यायाने आपण स्वत: व आपली भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त राहू शकेल असे त्यांनी सांगितले.
सामुदायिक औषधोपचार मोहिमेत ज्या रुग्णांनी डी.ई.सी व आयव्हरमेटीन गोळ्यांची मात्रा घेतली नाही त्यांनी पुढील 2 ते 5 दिवसात गोळ्यांची मात्रा आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपलब्ध करुन सेवन करावी. डी.ई.सी व आयव्हरमेटीन गोळ्या उपाशी पोटी घेवू नयेत. उपाशीपोटी गोळ्या घेतल्यास मळमळ, उलटी सारखा किरकोळ त्रास होऊ शकतो. म्हणून डी.ई.सी गोळ्या काहीतरी खाल्ल्यानंतरच घ्याव्यात. हत्तीरोग दुरीकरणासाठी दरवर्षी हत्तीरोग समस्याग्रस्त भागात एक दिवसीय डी.ई.सी व अलबेंडाझोलच्या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवून हत्तीरोग दुरीकरण करण्याचा संकल्प आहे.